कीटकनाशके कंपन्यांना परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 11:09 PM2017-10-13T23:09:03+5:302017-10-13T23:10:40+5:30

शेतकºयांच्या जीवावर फवारणी उलटल्यानंतर कारवाईच्या धास्तीने हजारो लिटर कीटकनाशकांची विल्हेवाट लावली जात आहे.

Return to pesticide companies | कीटकनाशके कंपन्यांना परत

कीटकनाशके कंपन्यांना परत

googlenewsNext
ठळक मुद्देकारवाईची धास्ती : हजारो लिटर कीटकनाशकांची रात्रीतून वाहतूक

सुरेंद्र राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शेतकºयांच्या जीवावर फवारणी उलटल्यानंतर कारवाईच्या धास्तीने हजारो लिटर कीटकनाशकांची विल्हेवाट लावली जात आहे. अनेक विक्रेत्यांनी आपल्याकडील साठा कंपन्यांना पाठविणे सुरू केले असून गत चार दिवसात हजारो लिटर कीटकनाशके रात्रीतून हलविण्यात आले. ही वास्तव ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमधून उघडकीस आले.
यवतमाळ जिल्ह्यात फवारणीतून विषबाधा झाल्याने १९ शेतकरी आणि शेतमजुरांचा बळी गेला. फवारणी शेतकºयांच्या जीवावर उलटल्याचे वृत्त ‘लोकमत’ने सर्वप्रथम १२ सप्टेंबर रोजी प्रकाशित केले होते. त्यानंतर शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. मंत्र्यांसह वरिष्ठ अधिकाºयांनी यवतमाळात धाव घेतली. आता या विषबाधेची वरिष्ठ पातळीवरून कारणमिमांसा सुरु आहे. अनेकांवर कारवाईचे संकेत आहे. अशा परिस्थितीत आपण कसे निर्दोष आहोत याचा निर्वाळा प्रत्येक जण देत आहेत. प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. कृषी विभागानेही हंगामापूर्वी करायची गोदाम तपासणी १९ जणांचे बळी गेल्यानंतर सुरू केली आहे. कृषी साहित्य विक्रेते व काही प्रतिबंधित कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल करणे सुरू केले. आतापर्यंत सात जणांवर कारवाई करून कृषी यंत्रणा पुन्हा थंडावली आहे. याचा फायदा कृषी विक्रेत्यांनी घेत कीटकनाशकांनी भरलेले गोदाम रिकामे करण्याचा सपाटा लावला आहे.
जिल्ह्यातील बहुतांश कृषी केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांचा साठा आहे. धाड पडल्यास कारवाईचा बडगा नको म्हणून अनेकांनी आता या साठ्याची विल्हेवाट लावणे सुरू केले आहे. दिवसभर दुकानाचे शटर बंद करून कीटकनाशकांचे पॅकिंग केले जाते. रात्री १० वाजता वाहनातून ही कीटकनाशके हलविली जात आहे. गेल्या चार दिवसांपासून हा प्रकार सर्वत्र सुरू आहे.
प्रस्तुत प्रतिनिधीने, या प्रकरणाचा भंडाफोड केला. बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास दत्त चौक परिसरात एका कृषी केंद्रासमोर एका मेटॅडोअरमध्ये कीटकनाशके भरली जात होती. चौकशी केली असता उरलेले बियाणे व कीटकनाशके कंपनीला परत पाठवित असल्याचे सांगितले. मात्र शटर बंद करून काही लोक आतमध्ये पॅकिंगचे काम करीत होते. याबाबत विचारले असता त्यांनी शटर उघडले. परंतु माहिती देताना त्यांची बोबडी वळल्याचे दिसत होते. येथे तणनाशक, कीटकनाशके आणि प्रतिबंधित असलेल्या पीजीआरचा साठा आढळून आला. या गोदामाची अवस्था पाहता त्यातील बराचसा माल या अगोदरच रफादफा केल्याचे दिसत होते. हा प्रकार गत चार दिवसांपासून सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्राकडून मिळाले. असाच प्रकार यवतमाळसह इतरही ठिकाणी सुरू असल्याची माहिती आहे.
कीटकनाशक विक्रेत्यांविरुद्ध कारवाई सुरू झाल्याने कंपन्यांचे मार्केटिंग अधिकारी, कर्मचारीसुद्धा यवतमाळात मुक्कामी होेते. त्यांच्याच सल्ल्यानुसार हा माल कंपन्यांकडे परत पाठविला जात आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी वाहन भरताना हे अधिकारीही तेथे उपस्थित होते. विशेष म्हणजे कारवाईच्या भीतीने अनेक मान्यता प्राप्त औषधांचा साठा देखील कंपन्यांना परत पाठविण्याचा सपाटा लावला आहे.
रिटेलरकडील औषधी होलसेलरकडे
कारवाईची धास्ती शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातील कृषी साहित्य विक्रेत्यांनी घेतली आहे. त्यांच्याकडे असलेला कीटकनाशकांचा साठा जिल्हास्तरीय विक्रेत्यांकडे आणून दिला आहे. आता जिल्हास्तरावरील हा साठा नागपूर, अकोला, बुलडाणा आदी शहरात हलविला जात आहे.

Web Title: Return to pesticide companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.