परतीचा पाऊस ठरला कापसाचा काळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2021 05:00 AM2021-10-17T05:00:00+5:302021-10-17T05:00:02+5:30
जिल्ह्यातील ७० टक्के शेतकऱ्यांची संपूर्ण मदार कपाशीच्या पिकावर आहे. सोयाबीनच्या पिकाला सप्टेंबरमधील पावसाने झोडपून काढले. त्यात तगलेल्या कापसावर शेतकऱ्यांच्या आशा होत्या. मात्र, दसऱ्याच्या सकाळपासूनच जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. एकीकडे कपाशी वेचण्यासाठी मजूर मिळत नसल्याने फुटलेला कापूस घरात कसा आणावा, याची चिंता असतानाच पावसाने हा लाखमोलाचा कापूस भिजविला. आता दोन दिवस उघाड पडल्याशिवाय हा कापूस वेचता येणेही शक्य नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्याला यंदा पाऊस पावला. मात्र, आता दोन दिवसांपासून बरसणाऱ्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची झोप उडविली आहे. मध्यंतरीच्या कडक उन्हाने फुटलेली कापसाची बोंडे पावसात भिजल्याने कपाशीची विक्री करताना शेतकऱ्यांना भाव पाडून दिला जाण्याचा धोका आहे. दरम्यान, पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू झाला असून, अन्य एका घटनेत एकजण बेपत्ता आहे.
जिल्ह्यातील ७० टक्के शेतकऱ्यांची संपूर्ण मदार कपाशीच्या पिकावर आहे. सोयाबीनच्या पिकाला सप्टेंबरमधील पावसाने झोडपून काढले. त्यात तगलेल्या कापसावर शेतकऱ्यांच्या आशा होत्या. मात्र, दसऱ्याच्या सकाळपासूनच जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. एकीकडे कपाशी वेचण्यासाठी मजूर मिळत नसल्याने फुटलेला कापूस घरात कसा आणावा, याची चिंता असतानाच पावसाने हा लाखमोलाचा कापूस भिजविला. आता दोन दिवस उघाड पडल्याशिवाय हा कापूस वेचता येणेही शक्य नाही. शिवाय कपाशी वेचून विक्रीसाठी नेल्यावर आर्द्रतेच्या बहाण्यावरून व्यापारी भाव पाडण्याची भीती निर्माण झाली आहे.
शुक्रवारी रात्री पांढरकवडा, घाटंजी, मारेगाव, झरी जामणी, वणी तालुक्यात धुवाधार पाऊस झाला. तर शनिवारी उमरखेड, आर्णी तालुक्यांतही पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात शनिवारी सकाळी ११ वाजता संपलेल्या २४ तासांत १३.८ मिलिमीटर पाऊस बरसला. तर शनिवारी दिवसभरही यवतमाळ शहरासह, घाटंजी, महागाव, पांढरकवडा, नेर, आर्णी, वणी, पुसद आदी तालुक्यांमध्ये पाऊस कोसळत होता.
जिल्ह्यात दोघांचा बुडून मृत्यू, एक जण बेपत्ता
पांढरकवडा/घोन्सा/रुंझा : एकीकडे सण-उत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच पावसादरम्यान नदीत बुडून दोघांचा मृत्यू झाला. यातील एक घटना वणी तालुक्यातील घोन्सा येथे तर दुसरी घटना पांढरकवडानजीक रुंझा येथे, तिसरी घटना साखरा येथे घडली.
राजू श्रीहरी बोरकुटे रा.घोन्सा आणि रफीक हारून सैयद (३०) रा.रूंझा अशी मृतांची नावे आहेत. राजू बोरकुटे शनिवारी दुपारी घट विसर्जनासाठी विदर्भा नदीवर गेला होता. राजूचा पाय घसरून नागरिकांच्या डोळ्यादेखत तो पुरात वाहात गेला. पोलीस पाटील सचिन उपरे, तलाठी गणेश सहाने, मंडळ अधिकारी ए.बी. मडावी, नायब तहसीलदार रामचंद्र खिरेकार आदी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र शनिवारी रात्रीपर्यंत शोध लागला नव्हता. यवतमाळ येथून बचाव पथकालाही पाचारण करण्यात आले.
रफीक हारून सैयद (३०) रा.रूंझा हा गुराखी आहे. शनिवारी नदी पार करण्यासाठी त्याची जनावरे पाण्यात उतरली. त्यासोबतच रफीकही पाण्यातून निघाला. मध्ये भोवरा तयार झाल्याने तो बुडाला. त्याच्या मागे आई, वडील, दोन भाऊ आहे. पांढरकवडा तालुक्यातील साखरा येथे देवी विसर्जनासाठी गेलेला श्रमिक निर्दोष तुराणकार रा. धारणा हा युवक नाल्याच्या डोहात बुडून दगावला.