यवतमाळचे शासकीय कृषी महाविद्यालय परत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 09:25 PM2018-09-17T21:25:14+5:302018-09-17T21:25:32+5:30

यवतमाळला मंजूर झालेले शासकीय कृषी महाविद्यालय पूर्ववत कायम ठेऊन त्याची स्थापना करावी, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा विधान परिषद सदस्य ख्वाजा बेग यांनी रविवारी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Return Yavatmal Government Agriculture College | यवतमाळचे शासकीय कृषी महाविद्यालय परत द्या

यवतमाळचे शासकीय कृषी महाविद्यालय परत द्या

Next
ठळक मुद्देअन्यायाची भावना : राष्ट्रवादीच्या आमदारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : यवतमाळला मंजूर झालेले शासकीय कृषी महाविद्यालय पूर्ववत कायम ठेऊन त्याची स्थापना करावी, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा विधान परिषद सदस्य ख्वाजा बेग यांनी रविवारी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
यवतमाळला मंजूर झालेले शासकीय कृषी महाविद्यालय मुख्यमंत्र्यांच्या जन्मगावी ता. मूल जि. चंद्रपूर येथे नेण्यात आले आहे. त्याऐवजी यवतमाळला अन्न प्रक्रिया महाविद्यालय देण्यात आले. यवतमाळचे कृषी महाविद्यालय पळवून नेऊनही जिल्ह्यातील सत्ताधारी व विरोधी बाकावरील एकही आमदार बोलत नसल्याबाबत आश्चर्य व्यक्त करणारे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. त्या पार्श्वभूमीवर आमदार ख्वाजा बेग यांनी जिल्ह्यातून सर्वप्रथम पुढाकार घेत हे महाविद्यालय परत देण्याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले.
ख्वाजा बेग म्हणाले, २०१६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यवतमाळसाठी ६० विद्यार्थी क्षमतेच्या शासकीय कृषी महाविद्यालयाची घोषणा झाली. ६० कोटींची आर्थिक तरतूदही करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील युवकांच्या आशा पल्लवीत झाल्या. या महाविद्यालयाच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या कृषी तंत्रज्ञानाचा फायदा स्थानिक शेतकऱ्यांना होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जाऊ लागली. मात्र नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत यवतमाळचे कृषी महाविद्यालय रद्द करण्यात आले. त्याऐवजी अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाला मंजुरी देण्यात आली. यामुळे जिल्ह्यातील युवकांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यात ग्रामीण क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाचा फायदा स्थानिक युवकांना होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे यवतमाळ येथे आधीच मंजूर केल्याप्रमाणे कृषी महाविद्यालयाची स्थापना करावी, अशी आग्रही मागणी आमदार ख्वाजा बेग यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

कृषी महाविद्यालय परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाईल. हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्नाद्वारे सरकारला जाब विचारला जाईल.
- ख्वाजा बेग, आमदार.

Web Title: Return Yavatmal Government Agriculture College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.