महसूल कर्मचारी क्रीडा कल्याण निधीची चौकशी
By admin | Published: January 20, 2015 12:15 AM2015-01-20T00:15:01+5:302015-01-20T00:15:01+5:30
महसूल कर्मचारी क्रीडा व कल्याण निधीच्या कारभाराची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असून त्यासाठी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : आरडीसींच्या नेतृत्वात समिती
यवतमाळ : महसूल कर्मचारी क्रीडा व कल्याण निधीच्या कारभाराची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असून त्यासाठी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे.
महसूल कर्मचारी क्रीडा व कल्याणासाठी दरवर्षी निधी गोळा केला जातो. सध्या यासाठी सुमारे सव्वा कोटी रुपयांचा निधी जमा आहे. या निधीसंबंधी जिल्हाधिकाऱ्यांकडे दोन आठवड्यांपूर्वी तक्रार करण्यात आली होती. त्या अनुषंगाने निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खेवले यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करण्यात आली. लेखाधिकारी कदम हे या समितीचे सदस्यसचिव असून सदस्य म्हणून वर्ग २ च्या लेखाधिकाऱ्यांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे. सुमारे आठवडाभरापासून ही चौकशी सुरू आहे. महसूल कर्मचारी क्रीडा कल्याण निधीचा गैरवापर होतो आहे, त्याचे रजिस्ट्रेशन नाही, महसूलच्या इमारत बांधकामाची परवानगी घेतली गेली नाही, असे तक्रारीत नमूद आहे. सदर निधी आणि संस्थेची धर्मदाय आयुक्ताकडे रितसर नोंदणी करावी, त्याचे आॅडिट करावे, अशी मागणी या तक्रारीद्वारे करण्यात आली आहे. दरम्यान महसूल कर्मचाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने सोमवारी जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांची भेट घेऊन चौकशी समितीचे अध्यक्ष बदलविण्याची मागणी केली. त्यामागील कारणेही विशद केली. त्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ चौकशीची सूत्रे अन्य कुणाकडे देण्याचे मान्य केल्याचे सांगितले जाते. (प्रतिनिधी)