महसूल जमिनीवर वृक्षतोड

By admin | Published: February 28, 2015 01:57 AM2015-02-28T01:57:27+5:302015-02-28T01:57:27+5:30

महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या यवतमाळ या गृहजिल्ह्यातच महसूल जमीन धोक्यात आली आहे. कुठे या जमिनीवर अतिक्रमण होत आहे ..

Revenue Trees Seedling | महसूल जमिनीवर वृक्षतोड

महसूल जमिनीवर वृक्षतोड

Next

यवतमाळ : महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या यवतमाळ या गृहजिल्ह्यातच महसूल जमीन धोक्यात आली आहे. कुठे या जमिनीवर अतिक्रमण होत आहे तर कुठे महसूल जमिनीवरील शेकडो हेक्टर क्षेत्रातील सागवान वृक्षांची खुलेआम कत्तल केली जात आहे. वनविभागातील अधिकारी आणि महसूल विभागातील गावपातळीवरील यंत्रणेच्या संगनमताने ही लुटालुट सुरू आहे.
जिल्ह्यात चहूबाजूने सागवानाचे जंगल आहे. पुसद, पांढरकवडा व यवतमाळ विभागात ते विस्तारले आहे. या जंगलातील परिपक्व झाडांची कार्यआयोजना अंतर्गत तोड केली जाते. जंगलात सर्वत्र सागवान दिसत असले तरी ती सर्वच जमीन वनखात्याची नाही. महसूल खात्याच्या हजारो हेक्टर जमिनीवरसुद्धा लाखो सागवान वृक्षे उभी आहेत. ही जमीन विशेषत: यवतमाळ आणि पांढरकवडा वनविभागात मोठ्या प्रमाणात आहे. परिपक्व झाडांची तोड करून ते लाकूड वखारीवर लिलावासाठी नेले जाते. यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या शेतातही मोठ्या प्रमाणात सागवान लागवड केली जाते. या मालकीतील सागवानाची तोड करण्यासाठी मात्र वन खात्याची पूर्व परवानगी घ्यावी लागते. या सागवानाच्या वाहतुकीसाठीही वनविभाग परवाना जारी करतो. वन परिक्षेत्र अधिकारी हा वनपालाच्या अहवालावर वृक्षतोडीची परवानगी देतो तर सहायक वनसंरक्षकांना या लाकडावर हॅमर लावण्याचे अधिकार आहे. मात्र या मालकीतील जंगल तोडीआड वन आणि महसूल विभागाच्या जमिनीवरील सागवानाचीही सर्रास तोड केली जात आहे. वन खात्याच्या अधिकाऱ्यांच्या साक्षीने ही तोड होत आहे. हे सागवान शेतकऱ्याच्या खासगी सागवानात मिळवून तस्करीच्या मार्गाने बाहेर पाठविले जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Revenue Trees Seedling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.