तीन जिल्ह्यातील शैक्षणिक प्रगतीचा यवतमाळात आढावा
By admin | Published: February 4, 2017 01:09 AM2017-02-04T01:09:38+5:302017-02-04T01:09:38+5:30
शिक्षणात केलेले बदल, राबविलेले विविध उपक्रम कितपत यशस्वी झाले, याचा आढावा घेण्यासाठी शालेय शिक्षण विभागाचे
प्रधान सचिवांचा दौरा : चंद्रपूर, वर्धाचा समावेश
यवतमाळ : शिक्षणात केलेले बदल, राबविलेले विविध उपक्रम कितपत यशस्वी झाले, याचा आढावा घेण्यासाठी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार शनिवारी ४ फेब्रुवारीला यवतमाळात येत आहेत. यवतमाळसह चंद्रपूर आणि वर्धा या दोन जिल्ह्यातील प्रगतीचाही आढावा यवतमाळातच घेतला जाणार आहे.
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा श्रोतृगृहात शनिवारी सकाळी १० वाजतापासून प्रधान सचिवांची आढावा सभा सुरू होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शिक्षणाची अवस्था सुधारण्यासाठी शिक्षण विभागाला केआरए (लक्ष्यपूर्ती उद्दिष्ट) ठरवून दिला होता. तो किती पूर्ण झाला, याचा आढावा प्रधान सचिव घेणार आहेत. यवतमाळ जिल्ह्यासह चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यातील शिक्षण विभागातील संबंधित अधिकारी या सभेला उपस्थित राहतील. तिन्ही जिल्ह्यांचे सीईओ, शिक्षणाधिकारी, डायटचे प्राचार्य, नगरपरिषदेचे प्रशासन अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख आदींना पाचारण करण्यात आले आहे. प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावरील शिक्षणात या तीन जिल्ह्यांनी कितपत मजल मारली आहे, याची पडताळणी यावेळी केली जाणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)