साहित्यातून कृषक समाजात क्रांती घडावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 10:10 PM2019-01-12T22:10:10+5:302019-01-12T22:14:20+5:30

लेखकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांची केवळ मांडणी करण्यापेक्षा ते सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. साहित्यातून कृषी क्षेत्रात क्रांती घडली पाहिजे, असा सूर मान्यवरांनी आळवला.

Revolutionize the literary society | साहित्यातून कृषक समाजात क्रांती घडावी

साहित्यातून कृषक समाजात क्रांती घडावी

Next
ठळक मुद्देपरिसंवादातील सूर : शेतकऱ्यांच्या मुलांनी लेखणी हातात घ्यावी

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी) : ग्रामीण आणि नागरी लेखकांच्या जाणिवा, भूमिका, निष्ठा, बांधिलकी वेगवेगळ्या असतात. नागरी लेखकांनी ग्रामीण जीवनाचा अनुभव घेतला नसल्याने ते वास्तव चित्रण करू शकत नाहीत. लेखकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांची केवळ मांडणी करण्यापेक्षा ते सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. साहित्यातून कृषी क्षेत्रात क्रांती घडली पाहिजे, असा सूर मान्यवरांनी आळवला.
साहित्य संमेलनामध्ये ‘कृषक समाजाच्या चित्रणाबाबत नागरी लेखक उदासीन का?’ या विषयावरील परिसंवाद पार पडला. यामध्ये डॉ. फुला बागुल (धुळे), सारंग दर्शने (मुंबई), गजानन नारे (अकोला), डॉ. देवेंद्र पुनसे (यवतमाळ), प्रभाकर सलगरे (आळंद) यांनी सहभाग घेतला.
डॉ. फुला बागुल म्हणाले, ‘नागरी लेखकांचा लोकवाड्मयाशी फारसा संबंध नसतो. ते केवळ रविवारी जगतात, त्यामुळे त्यांचं जगणं उपरं असतं. नागरी लेखकांची लेखणी प्रतिक्रीयावादी, म्हणूनच कृत्रिम असते. तिचा आदीमतेशी संबंध नसतो. नागरी लेखकांचा ध्यास कामोत्तेजक, विखारी, लोकानुरंजन आणि व्यक्तीवादी लेखन करण्याचा आहे. ग्रामीण आणि नागरी लेखकांचे अनुभवविशव, जाणिवा, निष्ठा, बांधिलकी, प्रेरणा, भूमिका वेगवेगळ्या असतात. ते शेती-मातीशी समरस होऊ शकत नाहीत. मुळात ग्रामीण लेखन हा साहित्याचा मध्यवर्ती आणि एकमात्र प्रमुख प्रवाह आहे.
सारंग दर्शने म्हणाले, ‘साहित्य, संगीत, चित्रपट अशा सर्वच कला कृषक समाजाच्या चित्राबाबत उदासीन आणि तोकड्या पडल्या आहेत. तरुण लेखक ग्रामीण वास्तवापासून पूर्णपणे तुटलेला आहे. जे माहीतच नाही, त्याबद्दल तळमळ वाटणारच कशी? काही अपवाद वगळता, शेतकऱ्यांचे जीवन आणि ग्रामीण जीवन लेखकांनी केवळ विनोदनिर्मितीचे साधन म्हणून वापरले आहे. साहित्यिकांच्या तिसऱ्या डोळ्याला शेतकऱ्यांचे दु:ख दिसत नाही का?'
गजानन नारे म्हणाले, ‘नागरी लेखकांची नाळ ग्रामीण जीवनाशी जुळलेली नसते. लेखकाच्या जाणिवा अनुभवाने समृद्ध होत असतात. समाजातील एखाद्या घटकावर अन्याय होत असेल तर तो आपल्या लेखनाचे केंद्र बनले पाहिजे. मात्र, अनुभव घेतला नसल्याने नागरी लेखकांच्या लेखनात परिणामकारकता येत नाही. काळाच्या ओघात ग्रामीण लेखकांच्या तुलनेत नागरी लेखकांची संख्या वाढत गेली. त्यामुळे ग्रामीण जीवनाचे दर्शन झाकोळले गेले. आता चित्र बदलू लागले आहे. ग्रामीण लेखकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे मोहोळ उठत आहेत. ग्रामीण जीवन, जागतिकीरणाशी संबंध याकडे डोळस लेखनातून लक्ष वेधले गेले पाहिजे. शेतकऱ्यांचे प्रश्न, ते सोडवण्याचा मार्ग यांची सामूहिक जबाबदारी लेखकानी घेतली तर आत्महत्या रोखण्यास मदत होईल.’
प्रभाकर सलगर म्हणाले, 'विचार मांडण्याची मुभा नसेल, विचार ऐकण्याची तयारी नसेल तर लेखक लिहिणार कसे? शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले जातील, कृती आराखडा तयार होईल असे लेखन झाले पाहिजे. हृदयाला भिडणारे वाचन प्रसवले तर वाचक वाचतील, शासनाला जाग येईल. असे प्रश्न मांडता येणार नसतील तर त्यांना लेखक म्हणायचे का, असा प्रश्न पडतो.

कृष्णक समाजाचे चित्रण करण्यात प्रत्येक प्रस्थापित लेखक कमी पडतो. साहित्य कोणत्याही भाषेतील असले तरी वास्तववादी लेखन झाले पाहिजे. साहित्यामध्ये ताकद, जाणीव असली पाहिजे. त्यातून शेतकऱ्यांमध्ये क्रांती घडली आहे का? क्रांती घडवणारे लेखन मराठी साहित्यात अपवादाने झाले. साहित्य हे प्रबोधनाचे माध्यम आहे. मात्र, शेतकऱ्यांचे प्रश्न केवळ साहित्यात मांडून चालणार नाही. प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
- डॉ. देवेंद्र पुनसे

परिसंवादादरम्यान, विष्णू पंत गायिखे यांनी शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून व्यासपीठावर येऊन विचार मांडले. ते म्हणाले, ‘शेतकऱ्यांची आंदोलने झाली, त्याबाबत चर्चा झाली. शेतकऱ्यांचे खरे प्रश्नही जाणून घ्यायची आज गरज आहे. शेतकरी देशाला अन्नधान्य उत्पादन करून देतो. मात्र, त्याच्या मुलाला मुलगी द्यायला कोणी तयार होत नाही. शेतकऱ्यांने माल रस्त्यावर फेकला तर त्याच्यावर टीका होते. मात्र, पालेभाजीच्या एका गड्डीसाठी सर्वसामान्य लोक त्याच्याशी वाद घालतात. शेतकऱ्यांचे प्रश्न इतर कोणी आता मांडेल अशी आशा न बाळगता आता शेतकऱ्यांच्या मुलांनीच लेखणी हातात घेतली पाहिजे.

Web Title: Revolutionize the literary society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.