कौतुकास्पद! रिधोरा ग्रामपंचायतीने केला विधवा प्रथा बंदचा ठराव; गावकऱ्यांकडून झाले स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2022 10:58 AM2022-09-03T10:58:40+5:302022-09-03T11:05:11+5:30
पतीच्या निधनानंतर विधवा पत्नीचे आता कुंकू पुसले जाणार नाही!
वडकी (यवतमाळ) : पतीच्या निधनानंतर पत्नीची अवहेलना होऊ नये, यासाठी विधवा प्रथा बंदचा ठराव राळेगाव तालुक्यातील रिधोरा ग्रामपंचायतीने घेतला आहे. या ठरावाला युवक-युवतींसोबतच गावातील ज्येष्ठ ग्रामस्थांनीही मंजुरी दिली आहे.
पत्नीचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे यासारख्या अनिष्ट प्रथांचे आजही पालन केले जाते. कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने घेतलेल्या ठरावानंतर शासनानेही यासंदर्भात परिपत्रक काढले. महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतींनी विधवा प्रथा बंद करावी, असे या परिपत्रकात म्हटले आहे.
रिधोराचे सरपंच उमेश गौळकार यांच्या अध्यक्षतेखाली समाज मंदिरात ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव सरपंचांनी मांडला. या निर्णयाला उपस्थित सर्वांनीच होकार दिला. सर्वांची संमती मिळाल्यानंतर ठराव मंजूर करण्यात आला. याशिवाय विविध ठराव या ग्रामसभेत घेण्यात आल्याची माहिती सरपंच उमेश गौळकार यांनी दिली. या ग्रामसभेला ग्राम सचिव वीणा राऊत, पोलीस पाटील ढगेश्वर मांदाडे, मुख्याध्यापक आर. के. सुखदेवे, तलाठी बावनकुळे, कोतवाल दीपक खिरखकर आदी उपस्थित होते.
विधवा प्रथा बंदची चळवळ राबविली जाणार आहे. याची सुरूवात रिधोरा गावातूनच केली जाईल. ग्रामसभेमध्ये सर्वांच्या संमतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वांनीच याचे स्वागत करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे सांगितले.
- उमेश गौळकार, सरपंच, रिधोरा, ता. राळेगाव
ग्रामपंचायतीने घेतलेला ठराव महिलांच्या सन्मानासाठी आहे. सध्या सुरू असलेली ही प्रथा थांबली पाहिजे. या चळवळीत आमचा सक्रिय सहभाग राहील.
- आशा निरगुडवार, रिधोरा
रिधोरा ग्रामपंचायतीने घेतलेला ठराव विधवा महिलांसाठी योग्य आहे. सर्वांच्या संमतीने हा ठराव घेण्यात आला असून, चळवळ म्हणून यासाठी कार्य केले जाईल. सर्वांचेच याकरिता सहकार्य राहील, असा विश्वास आहे.
- अनंतराव वाढई, अध्यक्ष, गुरूदेव सेवा मंडळ, रिधोरा
विधवा महिलांचे कुंकू पुसू नये, बांगड्या फोडू नयेत, असा ग्रामसभेत झालेला ठराव महिलांचा सन्मान वाढविणारा आहे. नव्या युगानुसार समाजाचा दृष्टिकोन बदलविणारा हा निर्णय आहे.
- छत्रूजी आडे, ज्येष्ठ नागरिक, रिधोरा