आधी बोटाला शाई मग होईल लगीन सराई !
By सुरेंद्र राऊत | Published: April 26, 2024 11:59 AM2024-04-26T11:59:39+5:302024-04-26T12:03:59+5:30
Yawatmal : मतदानानंतर यवतमाळहून अमरावतीला नवरदेवाची निघाली वरात.
यवतमाळ : लोकशाहीचा उत्सव साजरा होत असून लोकसभेच्या निवडणूकीचेमतदान होणार आहे. याच दिवशी विवाह होणार असल्याने दिग्रसच्या संदेश अस्वार या युवकाने प्रथम मतदान करून आपली वरात जवळपास १३० किलोमीटर अमरावती करिता निघाली आहे . राष्ट्रीय कर्तव्य प्रथम मनात ठेवूनच संदेश मतदान करून बोहल्यावर चढणार आहे.
मतदान करणे हे लोकशाहीतील एक महान सोहळा असतो. दर पांच वर्षांनी येणारा हा उत्सव सोहळा संपन्न करण्याची सर्वांचीच इच्छा असते. त्यातही देशाच्या सर्वोच्च सांसदीय प्रणाली कार्यकारी मंडळाचे सदस्य म्हणजेच खासदार निवडीचा हा सुवर्ण काळ कोणालाही गमवायचा नसतो. निवडणूकीची घोषणा व्हायच्या आधीच संदेश अस्वार व प्रज्ञा सुने यांचा विवाह सोहळाही याच दिवशी म्हणजे निवडणूक मतदानाच्या दिवशीच लग्नाची बहूप्रतिक्षित तारीख निघाल्याने संदेश अस्वार व परिवाराची मात्र पंचाईत झाली. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस संदेश अस्वार याचा विवाह अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ दस्तगिर येथील प्रज्ञा सुने या वधू शी ठरला. विवाह स्थळ व मतदान केंद्र यातील अंतर जवळपास १३० कि.मी.चे लग्न विधी पार पाडायचे की मतदान करायचे या द्विधा मनस्थितीत असणाऱ्या "संदेश"ने एक महत्वाचा निर्णय घेतला. "आधी लग्न लोकशाहीचे... मग माझे..." हा निर्णय समस्त मतदारांना अनमोल "संदेश" देणारा ठरला आहे. आज सकाळी मतदान करून वर आपली वरातत्याने अमरावती येथे नेली आहे . संदेशच्या या निर्णयाचे समस्त लोकशाही प्रेमींनी स्वागत केले असून संदेश अस्वार व परीवाराचे कौतुक होत आहे. इतर नागरिकांनी देखील या अनोख्या विवाहाचा आदर्श घेत देशाप्रती असलेले कर्तव्य मतदान करून पार पडण्याची गरज आहे.
निवडूणुकीविषयी बोलताना संदेश यांनी सर्व मतदारांना " आधी मतदान , नांतर जलपान " असे आवाहन केले आहे .