पांढरकवडात डेंग्यू, टायफाॅइड, मलेरियाचा धोका वाढतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:46 AM2021-08-24T04:46:07+5:302021-08-24T04:46:07+5:30
पावसामुळे पाणी साचून राहिल्याने आणि डासांच्या प्रजननामुळे या आजारात वाढ होत आहे. संसर्गजन्य कोरोना विषाणूची साथ, त्यात भरीस भर ...
पावसामुळे पाणी साचून राहिल्याने आणि डासांच्या प्रजननामुळे या आजारात वाढ होत आहे. संसर्गजन्य कोरोना विषाणूची साथ, त्यात भरीस भर शहरात ठिकठिकाणी साचलेले पाणी व त्यात निर्माण झालेल्या डासांच्या उत्पत्तीमुळे शहरात डेंग्यूसदृश आजाराची साथ पसरल्याचे समोर आले आहे. नगर परिषदेची निष्क्रियता लक्षात घेता आगामी दिवसांत डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होणार असल्याची शक्यता आहे. संभाव्य परिस्थिती लक्षात घेता प्रभागांमध्ये धुरळणी (फॉगिंग) ला खो देत नगर परिषद कुंभकर्णी झोपेत असल्याचे चित्र आहे. घरातील फ्रीज, कूलर, शोभिवंत फुलांची कुंडी, पाण्याची टाकी, तसेच अनेक दिवसांपासून साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होते. एडिस एजिप्ताय या डासाने चावा घेतल्यास डेंग्यूचा फैलाव होतो. डेंग्यू किंवा मलेरिया झालेले अनेक रुग्ण शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल न होता खासगी रुग्णालयात दाखल होतात. शहरातील काही खासगी रुग्णालयांत डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. आगामी दिवसांत अशा रुग्णांच्या संख्येत वाढ होणार असल्याची भीती वर्तविली जात आहे. जीवघेण्या डेंग्यूचा धोका ओळखून नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या यंत्रणेने वेळीच उपाययोजना करणे अपेक्षित असताना संबंधित विभाग कमालीचे निष्क्रिय ठरत असल्याचे दिसून येत आहे. डासांची पैदास रोखण्यासाठी प्रभागांमध्ये, तसेच घराघरांमध्ये धुरळणी करणे व साचलेल्या पाण्यांमध्ये औषध फवारणी करून पाणी वाहते करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने प्रभावी मोहीम राबविण्याची गरज असताना नगर परिषदेच्या आरोग्य विभागाने झोपेचे सोंग घेतल्याचे चित्र आहे.
बॉक्स : कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन
पावसाळा सुरू होताच कीटकजन्य आजारांना ब्रेक लावण्यासाठी गावातील प्रत्येक व्यक्तीने आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले; परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने, तसेच गावात अस्वच्छतेने कळस गाठल्याने सध्या कीटकजन्य आजाराने डोके वर काढले आहे. कोविड ओसरताच शहरासह, ग्रामीण भागात डेंग्यू या कीटकजन्य आजाराने डोके वर काढल्याने आरोग्य यंत्रणेसह ग्रामीण भागातील नागरिकांच्या अडचणीत भर पडली आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन शहरासह तालुक्यात डेंग्यूबाबत विशेष जनजागृती मोहीम राबविण्याची गरज आहे. स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या ग्रामपंचायती डेंग्यू निर्मूलनासाठी दुर्लक्षच करीत आहेत.