धोका माहीत आहे, पण प्रश्न रोजीरोटीचा आहे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 01:15 AM2017-10-13T01:15:31+5:302017-10-13T01:15:45+5:30

‘जीवाला धोका आहे, हे आम्हाला कळत नाही का? पण प्रश्न पोटाचा आहे. पाठीवर पंप घेऊन विषाची फवारणी करत मृत्यूच्या दारात उभे असतो’ हे वास्तव शेतशिवारात कीटकनाशकांची फवारणी करणाºया शेतमजुरांचे आहे.

Risk knows, but the question is rosary! | धोका माहीत आहे, पण प्रश्न रोजीरोटीचा आहे !

धोका माहीत आहे, पण प्रश्न रोजीरोटीचा आहे !

Next
ठळक मुद्देकुटुंब उघड्यावर : फवारणीत सहा शेतमजुरांचा बळी

ज्ञानेश्वर मुंदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : ‘जीवाला धोका आहे, हे आम्हाला कळत नाही का? पण प्रश्न पोटाचा आहे. पाठीवर पंप घेऊन विषाची फवारणी करत मृत्यूच्या दारात उभे असतो’ हे वास्तव शेतशिवारात कीटकनाशकांची फवारणी करणाºया शेतमजुरांचे आहे. जिल्ह्यात फवारणीमुळे १९ जणांचा बळी गेला असून त्यात सहा शेतमजुरांचा समावेश आहे. पोटासाठी जीव गमावलेल्या या शेतमजुरांचे कुटुंब मात्र उघड्यावर आले आहे.
यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्यांसाठी ओळखला जातो. परंतु गत दोन महिन्यांत या जिल्ह्याची नवी ओळख कीटकनाशक फवारणीच्या बळींमुळे होत आहे. १९ जणांचा प्राण गेला असून शेकडो शेतकरी आणि शेतमजूर मृत्यूच्या उंबरठ्यातून परतले आहे. यवतमाळ जिल्ह्यात गत काही वर्षांपासून फवारणीने विषबाधा होण्याचे प्रकार वाढले आहे. परंतु यंदा या फवारणीने कहरच केला. विविध कारणांनी फवारणी शेतकºयांच्या जीवावर उलटली. यात शेतकºयाच्या कामाला गेलेल्या शेतमजुराचाही बळी गेला आहे. जिल्ह्यात सहा मजुरांचा फवारणीने बळी घेतला. त्यात कळंब येथील देवीदास रामाजी मडावी, घाटंजी तालुक्यातील कुर्लीचा रमेश येरन्ना चिल्लरवार व मानोलीचा बंडू चंद्रभान सोनुले, मारेगाव येथील वसंत केशव सिडाम, दारव्हा तालुक्यातील उचेगावचा रवी धन्नू राठोड यांचा समावेश आहे.
फवारणीसाठी आता शासकीय पातळीवर मार्गदर्शन केले जाते. विविध माध्यमातून शेतकरी आणि शेतमजुरांना फवारणी कशी करावी, हे सांगितले जाते. परंतु शेतातील वास्तव वेगळेच आहे. अनेक शेतमजूर म्हणतात, आम्ही यंदाच फवारणी करत नाही. कित्येक वर्षांपासून हेच काम करतो. परंतु असा प्रकार कधीच झाला नाही. सुरक्षेच्या साधनांचे काय? शेतकºयाजवळच गॉगल आणि हातमोजे नसतात.
मग आमच्या मजुराकडे येणार तरी कसे? जीवाला धोका आहे, पण प्रश्न पोटाचा आहे, असा थेट सवालच शेतमजूर करतात. शासनाने गांभीर्याने हा विषय घेतला. सर्वांना मदतही घोषित केली. परंतु या मदतीत त्यांचे होणार तरी काय? ज्यांच्याकडे शेतीचा थोडा तरी तुकडा आहे, ते कसेतरी जगतील.
परंतु ज्या शेतमजुरांचा चरितार्थच कुटुंबप्रमुखावर होता, त्याचाच फवारणीने बळी घेतला. त्यामुळे अख्खे कुटुंब उघड्यावर आले. दोन लाख रुपये किती दिवस पुरतील? मुलांच्या व कुटुंबाच्या पुनर्वसनाचा कायमस्वरूपी तोडगा शासनाने काढावा, अशी विनंती आता बळी ठरलेल्या शेतमजुरांचे कुटुंबीय करीत आहे.

पहिला मृत्यू कळंबमध्ये
कीटकनाशकाच्या फवारणीत पहिला बळी ठरला तो कळंब येथील शेतमजूर देवीदास रामाजी मडावी. शेतात फवारणी करताना विषबाधा झाली. शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र १९ आॅगस्ट रोजी त्याचा मृत्यू झाला. यानंतर जिल्ह्यात पाठोपाठ १९ शेतकरी-शेतमजुरांचे बळी गेले. या सर्वांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दोन लाख रुपयांची मदत देण्यात आली. परंतु ही मदत अतिशय तुटपुंजी आहे.

कीटकनाशकांचा शरीरावर दीर्घकालीन परिणाम
जिल्ह्यात कीटकनाशकांच्या फवारणीने ४०० च्या वर शेतकरी-शेतमजूर मृत्यूच्या दाढेतून परत आले. घामावाटे त्यांच्या शरीरात विष भिनले. उपचार करून ही मंडळी आता आपल्या गावी गेली आहे. परंतु या कीटकनाशकांचे काही अंश त्यांच्या शरीरात असण्याची शक्यता आहे. कीटकनाशकांचा दीर्घकालीन परिणाम या शेतकरी-शेतमजुरांवर होण्याची शक्यता आहे. शासकीय पातळीवर केवळ फवारणीसाठी मार्गदर्शन केले जात आहे. मात्र विषबाधा झाल्यानंतर बाधितांनी कोणती काळजी घ्यावी, याबाबत कुणी काहीच सांगत नाही. विषबाधित शेतकरी मानसिकदृष्ट्या खचले असून त्यांच्या समुपदेशनाचीही गरज आहे.

Web Title: Risk knows, but the question is rosary!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.