नदीकाठच्या शेतांना धोका
By admin | Published: June 8, 2014 12:11 AM2014-06-08T00:11:33+5:302014-06-08T00:11:33+5:30
तालुक्यातून वाहणार्या वर्धा व पैनगंगा नदीच्या पुरामुळे नदी काठावरील गावांतील शेतकर्यांचे प्रचंड नुकसान होते. पुराचे पाणी शेतात शिरून शेती खरडून गेल्याने त्यांचे हिरवे स्वप्न कोमेजते.
वणी : तालुक्यातून वाहणार्या वर्धा व पैनगंगा नदीच्या पुरामुळे नदी काठावरील गावांतील शेतकर्यांचे प्रचंड नुकसान होते. पुराचे पाणी शेतात शिरून शेती खरडून गेल्याने त्यांचे हिरवे स्वप्न कोमेजते. त्यामुळे बळीराजा देशोधडीला लागतो. त्या मोबदल्यात शासनाकडून तुटपुंजी मदत मिळत असल्याने त्यांची एकप्रकारे चेष्टाच होते.
वर्धा, पैनगंगा नदीच्या खोर्यात मोठय़ा प्रमाणात खनिज साठा उपलब्ध आहे. त्यात दगडी कोळसा मोठय़ा प्रमाणात आहे. परिणामी तालुक्यात कोळशाच्या खुल्या व भूमिगत खाणी तयार झाल्या आहेत. या खाणीतील मातीचे ढिगारे नदी काठालगत टाकण्यात आल्याने ते पावसाळय़ात ग्रामस्थांसाठी धोकादायक ठरतात. मातीच्या ढिगार्यांमुळे पुराचे पाणी गावात शिरते. ते शेतातही पसरते. त्यामुळे शेतातील पीक पूर्णत: पाण्याखाली येते. पाण्यामुळे ते पिवळे पडून जागीच सडते. त्यात शेतकर्यांचे प्रचंड नुकसान होते. त्यांना आर्थिक फटका बसतो. या पुरामुळे शेतकर्यांच्या हिरव्या स्वप्नावरच पाणी फेरले जाते. वर्धा, पैनंगगा नदी व निगरुडा नदी तसेच नाल्यांना पूर आल्यास या शेतपिकांचे नुकसान होते. नाल्यांचे पाणी पुढे सरकत नसल्याने ते शेतात शिरते. त्यामुळे शेतमालाचे प्रचंड नुकसान होते. परिणामी रखरखत्या उन्हात घाम गाळून मशागत करून तयार केलेली शेतजमीन पुरामुळे खरडून जाते. पूर नैसर्गिक असतो. मात्र वेकोलिच्या मातीच्या ढिगार्यांनी आडकाठी आणून नदी व नाल्यांना वळण दिल्याने पुराचा धोका वाढतो. तथापि वेकोलि शेतकर्यांना मदत करण्यास पुढाकार घेत नाही. प्रदूषणामुळे शेत पिकांचे नुकसान झाले, तरी वेकोलि पुरेशी मदत करीत नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. (कार्यालय प्रतिनिधी)