दिग्रस येथील वळण रस्ताच वाहून गेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 22:18 IST2018-06-17T22:18:25+5:302018-06-17T22:18:25+5:30
मुसळधार पावसामुळे दिग्रस शहर व देवनगरला जोडणारा वळण रस्ता धावंडा नदीच्या पुरात वाहून गेला. यामुळे देवनगरचा दिग्रस शहराशी संपर्क तुटला आहे.

दिग्रस येथील वळण रस्ताच वाहून गेला
लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : मुसळधार पावसामुळे दिग्रस शहर व देवनगरला जोडणारा वळण रस्ता धावंडा नदीच्या पुरात वाहून गेला. यामुळे देवनगरचा दिग्रस शहराशी संपर्क तुटला आहे.
दिग्रस-पुसद मार्गावर धावंडा नदीवरील पूल पाडून नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे. हा मार्ग सध्या रहदारीकरिता बंद आहे. जड वाहनांची वाहतूक बायपासने वळविण्यात आली आहे, तर दुचाकी, लहान वाहने आणि पादचाऱ्यांकरिता तात्पुरता वळण रस्ता तयार करण्यात आला होता. संततधार पावसामुळे हा रस्ताच वाहून गेला. मुसळधार पावसामुळे धावंडा नदीला पूर आला. या पुराच्या प्रवाहाने वळण रस्ता वाहून गेला.
सध्या पावसाळा असल्याने नवीन तात्पुरता वळण रस्ता तयार करणे शक्य नाही. त्यामुळे शहरातील संपूर्ण वाहतूक आता बायपासने वळविण्यात आली आहे. पूर्वी बायपासवरून केवळ जड वाहतूक वळविण्यात आली होती. आता हाच बायपास सर्व ाहतुकीसाठी वापरला जात आहे. तात्पुरता वळण रस्ता वाहून गेल्याने या धोकादायक रस्त्याने नदीपात्र ओलांडून कुणीही जावू नये म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता बंद केला. या रस्त्याने कुणीही ये-जा करू नये, असे आवाहन शाखा अभियंता राजू चव्हाण यांनी केले.
दोन किलोमीटरचा फेरा
तात्पुरता वळण रस्ता पुरामुळे वाहून गेल्याने बायपासने शहरात येण्यासाठी सर्वांना दोन किलोमीटरचा फेरा मारावा लागत आहे. देवनगरवासीयांना दोन किलोमीटर अंतर कापून शहरात यावे लागत आहे. यामुळे त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. मागील वर्षीही अशीच स्थिती निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांना शाळेत येण्या-जाण्यास प्रचंड त्रास सहन करावा लागला.