यवतमाळातील रस्त्यांचे आरोग्य बिघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 06:00 AM2019-09-20T06:00:00+5:302019-09-20T06:00:05+5:30
यवतमाळ शहरात बेंबळा पाईपलाईन, भूमिगत गटार, अमृत योजना, रस्ता रुंदीकरण या सारखी विकास कामे केली जात आहेत. विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने अचानक या विकास कामांना कधी नव्हे तेवढा वेग आला आहे. विकासाच्या नावाखाली ठिकठिकाणचे रस्ते खोदून ठेवले गेले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आजच्या घडीला यवतमाळ शहरातील अनेक रस्ते विकास कामांच्या नावाने खोदलेले आहेत. तर बहुतांश रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे या रस्त्यांवरून वाहने चालवितांनाच नव्हे तर पादचाऱ्यांनाही तारेवरची कसरत करावी लागते. यवतमाळातील एकही रस्ता सुस्थितीत नसल्याने आठवडाभरावर आलेल्या दुर्गोत्सवात वाहतुकीची कोंडी निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
यवतमाळ शहरात बेंबळा पाईपलाईन, भूमिगत गटार, अमृत योजना, रस्ता रुंदीकरण या सारखी विकास कामे केली जात आहेत. विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने अचानक या विकास कामांना कधी नव्हे तेवढा वेग आला आहे. विकासाच्या नावाखाली ठिकठिकाणचे रस्ते खोदून ठेवले गेले आहेत. काम झाल्यावर त्या रस्त्यांची डागडुजी करण्याचे सौजन्यही संबंधित विभाग व कंत्राटदाराकडून दाखविले जात नाही. भूमिगत गटारसाठी रस्त्याच्या मधोमध खोदकाम झाले आहे. या कामानंतर डागडुजी न झाल्याने संपूर्ण रस्ताच खोदल्याचे चित्र आहे. खोदलेल्या रस्त्याची माती-मुरुम तेथेच पडून असल्याने पावसाळ्यात या रस्त्यांवर पूर्णत: चिखल तयार झाला आहे. त्यात सर्रास वाहने घसरुन पडत असल्याने कित्येकांना अपघाताच्या घटनांना सामोरे जावे लागले. त्यातून काहींना अपंगत्वही आले आहे. याशिवाय बहुतांश रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. ते बुजविण्याच्या नावाखाली या खड्ड्यांमध्ये चक्क मुरुम, माती टाकली जात आहे. त्यावर रोलर फिरविले जात नसल्याने पावसात त्या रस्त्यावर अक्षरश: गटार तयार झाले आहे. ‘यापेक्षा खड्डाच बरा होता’, असे म्हणण्याची वेळ यवतमाळकरांवर आली आहे.
एक तर आधीच सर्वत्र रस्ते खोदले गेले, त्यात रस्त्यांवर खड्डेही पडले. हे कमी होते म्हणून की काय ऐन निवडणुका व दुर्गोत्सवाच्या तोंडावर बसस्थानक ते पांढरकवडा रोड या नव्या मार्गाचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे वाहने नेमकी न्यावी कोठून असा प्रश्न निर्माण झाला आहे. हे रस्त्याचे बांधकाम दुर्गोत्सव व निवडणुकीनंतर सुरू करता आले नसते काय? असा यवतमाळकरांचा सवाल आहे. निवडणुकीत विकास दाखविता यावा व त्याचे राजकीय श्रेय घेता यावे यासाठी आचारसंहितेपूर्वी या रस्त्याचे काम सुरू करण्यात आल्याचा आरोप होतो आहे.
वाहनांची गर्दी, कर्णकर्कश हॉर्न, बंद पडलेले सिग्नल, वाहतूक पोलिसांची वाणवा, तैनातीच्या ठिकाणीही सतर्क नसलेले वाहतूक पोलीस, पोलीस असूनही रस्त्यावर अस्ताव्यस्त उभ्या राहणाºया ट्रॅव्हल्स, प्रवासी-टॅक्सी वाहने, वाहनाचा धक्का लागण्यावरून रस्त्यावर उद्भवणारी भांडणे आदी बाबींमुळे ऐन सण-उत्सवात एखादवेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची व सण-उत्सवाला गालबोट लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुर्गोत्सवाला अद्याप आठवडा असल्याने पोलीस प्रशासनाने शहरातील अंतर्गत वाहतुकीचे नियोजन करावे, गर्दीच्या ठिकाणी अतिरिक्त वाहतूक पोलीस तैनात करावे व त्यांना सातत्याने वाहतूक सुरळीत करण्याच्या सूचना द्याव्या, उखडलेल्या रस्त्यांची कायमस्वरूपी डागडुजी करावी, विकास कामासाठी खोदल्या जात असलेले रस्ते काम होताच लगेच मागून पूर्ववत करावे अशी तमाम यवतमाळकरांची मागणी आहे. उखडलेल्या रस्त्यांमुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य निर्माण झाले असून त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ‘विकास हवा असेल तर त्रास होणारच’ हा सत्ताधारी नेते व अभियंत्यांचा युक्तीवाद नागरिकांना मान्य आहेच, मात्र या कामांबाबत वेळेचे योग्य नियोजन झाले असते तर नागरिकांना बराच रिलिफ देता आला असता, असा जनतेतील सूर आहे.
दुर्गोत्सवात शहरात वाहतूक कोंडी होण्याची चिन्हे
आजच्या घडीला केवळ पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यासमोरील एकमेव मार्ग सुस्थितीत असल्याने या रस्त्यावर आता प्रचंड वाहने धावताना दिसत आहे. आतापर्यंत केवळ दुचाकी व कार सारखी वाहने धावणाºया सर्वाधिक वर्दळीच्या दत्त चौकातून चक्क एसटी बसेस धावताना दिसत आहे. एवढ्या लांब बसेस वळण घेताना प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच आता आठवडाभरावर दुर्गोत्सव आला आहे. त्याच्या तयारीसाठी शहरातील बरेच मार्ग दोन-तीन आठवड्यांपासून बंद पडले आहेत. त्यामुळे आधीच वळण घेत बाहेर पडावे लागते. खोदलेले रस्ते व रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे आता दुर्गोत्सवात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होण्याची चिन्हे आहे.
संयुक्त बैठकीत तोडगा निघण्याची अपेक्षा
यवतमाळ शहराचे प्रतिनिधीत्व करणाºया पालकमंत्री मदन येरावार, नगराध्यक्ष कांचन चौधरी, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, नगरपरिषदेचा बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आदींनी संयुक्त बैठक घेऊन शहरातील या संभाव्य वाहतूक कोंडीवर तोडगा काढावा व शक्य असेल तेवढे रस्ते तातडीने सुस्थितीत आणावे, अशी एकमुखी मागणी आहे.