अतिक्रमणाने रस्ते अरुंद
By admin | Published: January 23, 2017 01:10 AM2017-01-23T01:10:09+5:302017-01-23T01:10:09+5:30
शहरात मुख्य रस्त्यासह इतर मार्गावर अतिक्रमण वाढत असून यामुळे रस्ते अरुंद होत आहे.
वाहतुकीचा बोजवारा : अतिक्रमण हटाव मोहिमेचा पत्ताच नाही
पुसद : शहरात मुख्य रस्त्यासह इतर मार्गावर अतिक्रमण वाढत असून यामुळे रस्ते अरुंद होत आहे. वाहतुकीची कोंडी नित्याची बाब झाली असून गेल्या वर्षभरापासून अतिक्रमण हटाव मोहीम मात्र राबविण्यात आली नाही. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन अपघातात वाढ झाली आहे.
पुसद शहराच्या विस्ताराबरोबर दुचाकी, चारचाकी वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न जटील झाला आहे. शिवाजी चौक ते महात्मा फुले चौक, गांधी चौक ते सुभाष चौक, शिवाजी चौक ते सुभाष चौक हा मुख्य रस्ता अरुंद झाला आहे. या रस्त्यावरच फळविक्रेते, भाजीपाला विक्रेते हातगाड्या उभ्या करतात. आॅटोरिक्षा चालक, धान्य खरेदी करणारे व्यापारी, मालवाहतूक करणारी वाहने आपली वाहने उभी करतात. त्यामुळे वारंवार रहदारीस अडथळा निर्माण होतो. वाहनधारकांना या रस्त्यावरून चालताना मोठी कसरत करावी लागते.
मुख्य रस्त्यावर बाजारपेठ, तहसील कार्यालय, शाळा-महाविद्यालय, न्यायालय, बँका असल्याने प्रचंड वर्दळ असते. काही रस्त्यावर सकाळपासून रात्रीपर्यंत माल वाहतूक करणारी वाहने उभी असतात. शिवाजी चौक ते बसस्थानकाजवळी रस्त्यांवर अवैध वाहतूकदारांचा ठिय्या असतो. प्रवासी भरण्यासाठी आॅटोरिक्षा आणि चारचाकी वाहनांची चढाओढ सुरू असते. त्यामुळे येथे वाहतुकीची कोंडी होते. रविवारी आठवडी बाजार असल्याने या ठिकाणी पाय ठेवायलाही जागा नसते. आठवडी बाजारात तर पायी चालणे देखील कठीण होते. बसस्थानक परिसर, शिवाजी चौक ते डॉ. आंबेडकर चौक, गांधी चौक ते सुभाष चौक हा मुख्य रस्ता अरुंद झाला आहे. पुसद येथे राज्य परिवहन महामंडळाचे आगार असून राज्याच्या कानाकोपऱ्यातून बसेस येतात. परंतु वाहतुकीच्या कोंडीमुळे या बसेस अडकून पडत आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. परंतु पुसद शहरात मात्र अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली नाही. त्यामुळे अतिक्रमणधारकांचे मनोबल वाढले आहे. नगरपालिका व महसूल विभागाने या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)
४७ धार्मिक स्थळांचे निष्कासन अटळ
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सार्वजनिक ठिकाणी असलेली धार्मिक स्थळे निष्कासीत करण्याचे आदेश असून पुसद शहरातील तब्बल ४७ धार्मिक स्थळांना मुख्याधिकारी अजय कुरवाडे यांनी नोटीस बजावल्या आहेत. ५ मे २०११ च्या शासन निर्णयानुसार नगरपरिषद क्षेत्रातील अनधिकृत धार्मिक स्थळे निष्कासीत करावी याबाबत संबंधितांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. परंतु प्रकरण न्यायालयात गेले होते. तेथे स्थगिती मिळाली. परंतु आता उच्च न्यायालयाने राज्य शासनाला आदेश दिल्याने ही कारवाई अटळ आहे. पुसद शहरातील ४७ अनधिकृत धार्मिक स्थळे काढण्यासाठी नगरपरिषदेने पुढाकार घेतला आहे.