रस्ते अडकले जाचक अटीत
By admin | Published: August 29, 2016 01:03 AM2016-08-29T01:03:21+5:302016-08-29T01:03:21+5:30
निसर्ग सौंदर्याचे भरभरुन दान मिळालेल्या उमरखेड तालुक्यातील बंदी भागातील नागरिकांना अत्यंत खराब रस्त्यांमुळे मरणयातना सोसाव्या लागत आहेत.
नागरिकांना मरणयातना : सहस्त्रकुंड पर्यटनस्थळ उपेक्षितच
उमरखेड : निसर्ग सौंदर्याचे भरभरुन दान मिळालेल्या उमरखेड तालुक्यातील बंदी भागातील नागरिकांना अत्यंत खराब रस्त्यांमुळे मरणयातना सोसाव्या लागत आहेत. अभयारण्याच्या जाचक अटींमुळे रस्ते आणि बंदी भागातील एकंदरच विकास कामे अडकली आहे.
उमरखेड तालुक्यात पैनगंगा अभयारण्य आहे. ब्रिटीशकाळापासून या जंगलातील ४० गावांना बंद भाग म्हणून ओळखले जाते. ब्रिटीशांनी आपल्या सोईसाठी सर्वसामान्य नागरिकांना या भागापासून दूर ठेवले. मात्र आता स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाल्यानंतरही बंदी भागात जाताना नागरिकांना मरणयातना सोसाव्या लागतात. रस्ते म्हणजे विकासाचे पहिले पाऊल. परंतु बंदी भागातील रस्त्यांना रस्ते म्हणावे काय असा प्रश्न आहे. उमरखेडपासून हरदडापर्यंत थोडातरी चांगला रस्ता आहे. परंतु पुढे रस्ताच नाही. त्यानंतर रस्त्यावर खड्डे की खड््यात रस्ते अशी अवस्था आहे. रस्त्याची अक्षरश: चाळणी झाली आहे. तुटलेल्या रस्त्यांमुळे वाहनांची वर्दळ तुरळक असते. खासगी वर्दळ तुरळक असते. खासगी वाहने या भागात जायला अजिबात तयार नसतात. राज्य परिवहन महामंडळाची एखादी बस सुरू असते. त्यामुळे प्रत्येक थांब्यावर नागरिक तासन्तास उभे असतात. रस्त्याच्या दैनावस्थेमुळे बस नादुरुस्त होणे ही नित्याचीच बाब आहे. लोकांना तालुक्याच्या ठिकाणी जाताना कसरत करावी लागते. बंदी भागातील नागरिकांनी रस्त्यासाठी वेळोवेळी आंदोलने केली. आत्मदहनाचा इशारा दिला. निवडणुकीवर बहिष्कार टाकला. तरीही रस्ते झाले नाही.
जिल्ह्यातील पर्यटनाचा मानबिंदू म्हणून मुरली येथील सहस्त्रकुंड धबधबा ओळखला जातो. पैनगंगेवरील हा जलप्रपात पाहण्यासाठी शेकडो पर्यटक येतात. परंतु रस्ते पाहून एकदा गेलेला पर्यटक दुसऱ्यांदा येत नाही. महत्वाचे म्हणजे सहस्त्रकुंडपर्यंत जाण्यासाठी चांगला रस्ताच नाही. पर्यटनस्थळ म्हणून शासनाकडून कुठलाही निधी आजपर्यंत मिळाला नाही. त्यामुळे या स्थळाचा विकासही होऊ शकला नाही.
निवडणुकीच्या काळात बंदी भागातील नागरिकांना विविध समस्या सोडविण्याची आश्वासने दिली जातात. लोकप्रतिनिधी घोषणांचा पाऊस पाडतात. मात्र एकदा निवडणूक आटोपली की, पुढील पाच वर्ष कुणीही येऊन पाहत नाही. आता या गोष्टीची येथील जनतेलाही सवय झाली आहे. (शहर प्रतिनिधी)
1जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह कोणत्याही प्रश्नावर तत्काळ रिझल्ट देतात. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी भागाचा दौरा करून परिस्थितीची पाहणी करून समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करावी, अशी अपेक्षा बंदी भागात व्यक्त केली जात आहे.
2उमरखेड तालुक्यातील गाडीबोरी, थेरडी, खरबी, दराटी, सोनदाभी, जवराळा, मोरचंडी, पिंपळगाव, मुरली, सहस्त्रकुंड, मथुरानगर, जेवली, एकंबा अशा गावांमध्ये सुविधांचा अभाव आहे. तरुणांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शासकीय योजना केवळ कागदोपत्रीच दिसतात.
3बंदी भागात असलेली आरोग्य यंत्रणाही कुचकामी ठरत आहे. त्यामुळे कुणी आजारी पडल्यास त्याला उमरखेड किंवा नांदेडला न्यावे लागते. वेळेवर वाहन उपलब्ध होत नाही. त्यामुळे रुग्णांना नेताना कसरत करावी लागते. अनेक प्रसूती तर भर रस्त्यात बैलगाडीमध्ये होतात. काही रुग्णांना गावातच वनौषधी घेऊन समाधान मानावे लागते. साप, विंचू, इंगळी चावली तर उपचारासाठी ढाणकी किंवा उमरखेडला आणेपर्यंत जीव गमावण्याची वेळ येते.