भाजपा कार्यकर्त्याच्याच घरासमोरील रस्ता गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 11:14 PM2018-01-17T23:14:32+5:302018-01-17T23:15:18+5:30

दारव्हा रोड स्थित श्रीकृष्णनगरातील एका भाजपा कार्यकर्त्याच्या घरासमोरील पालकमंत्र्यांनी भूमिपूजन केलेला सहा लाखांचा रस्ताच गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. या प्रकाराबाबत काँग्रेसमधून ओरड सुरू असताना तो भाजपा कार्यकर्ता गप्प असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Road outside BJP worker's house disappeared | भाजपा कार्यकर्त्याच्याच घरासमोरील रस्ता गायब

भाजपा कार्यकर्त्याच्याच घरासमोरील रस्ता गायब

Next
ठळक मुद्देपालकमंत्र्यांनी केले होते भूमिपूजन : नामफलक मात्र दुसरीकडेच

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दारव्हा रोड स्थित श्रीकृष्णनगरातील एका भाजपा कार्यकर्त्याच्या घरासमोरील पालकमंत्र्यांनी भूमिपूजन केलेला सहा लाखांचा रस्ताच गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. या प्रकाराबाबत काँग्रेसमधून ओरड सुरू असताना तो भाजपा कार्यकर्ता गप्प असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
श्रीकृष्णनगरात भाजपा कार्यकर्त्याच्या घरासमोर सन २०१६ मध्ये वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून सहा लाख रुपयांचा रस्ता मंजूर करण्यात आला होता. मोरवे यांच्या घरापासून गांधी यांच्या घरापर्यंत असा हा रस्ता होता. त्यासाठी निधीची तरतूदही केली गेली होती. तत्कालीन ऊर्जा राज्यमंत्री तथा विद्यमान पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते या रस्त्याचे भूमिपूजन थाटामाटात पार पडले होते. तसा फलकही लावण्यात आला होता. मंत्र्यांकडून सिमेंट रस्ता खेचून आणला म्हणून त्या कार्यकर्त्याने परिसरातील नागरिकांकडून शाबासकीही मिळवून घेतली होती. परंतु आता प्रत्यक्षात तेथे स्थिती वेगळीच आहे. हा सहा लाखांचा रस्ताच तेथून गायब झाला आहे. त्याचा नामफलक मात्र दारव्हा रोडवर दुसºयाच रस्त्यावर उभा दिसतो आहे. वास्तविक त्या रस्त्याचा आणि नामफलकाचा दुरान्वये संबंध नाही. या माध्यमातून जनतेच्या डोळ्यात धूळ फेक केली जात असल्याचा प्रकार काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी उघडकीस आणला. काही दिवसांपूर्वी या फलकावर कुणीतरी दगडफेकही केल्याचे सांगितले जाते. रस्त्यासाठी मंजूर झालेले सहा लाख रुपये नेमके कुठे खर्च झाले हा संशोधनाचा विषय आहे. काम खेचून आणले म्हणून पाठ थोपटून घेणारा तो भाजपा कार्यकर्ता मात्र मूग गिळून आहे. त्यामुळेच आश्चर्य व्यक्त केले जाते. हा कार्यकर्ता गप्प राहण्यामागे पक्षशिस्त की नेत्याची दहशत असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कार्यकर्ता गप्प का?
रस्ते गायब होण्याचे प्रकार नेहमीच होतात. चांगल्या रस्त्यावर दुसऱ्यादा काम करण्याचे प्रकारही घडले आहे. अतिदुर्गम भागात तर रस्ते, देखभाल-दुरुस्ती केवळ कागदावरच होते. मात्र हा प्रकार चक्क सुशिक्षितांच्या व राजकीय नेत्यांच्या नगरात जिल्हा मुख्यालयी घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते. सरकारच्या कारभारावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी पक्षाच्या कार्यकर्त्यांची असते. श्रीकृष्णनगरातील रस्ता गायब प्रकरणात सरकारला जाब विचारण्याऐवजी कार्यकर्ता गप्प असल्याने युती सरकारमध्ये पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांना ‘व्हाईस’च नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Web Title: Road outside BJP worker's house disappeared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.