रोड रॉबरीतील तिघांना पीसीआर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 11:27 PM2018-03-16T23:27:26+5:302018-03-16T23:27:26+5:30
पांढरकवडा पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडलेल्या रोड रॉबरीतील दोन आरोपींना न्यायालयाने शुक्रवारी तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली.
ऑनलाईन लोकमत
पांढरकवडा : पांढरकवडा पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडलेल्या रोड रॉबरीतील दोन आरोपींना न्यायालयाने शुक्रवारी तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली. चौकशीदरम्यान आरोपींनी पोलिसांना अनेक गुन्ह्यांची कबुली दिल्याची माहिती आहे.
दिलीप पवार व शामपाल पवार हे दोघेही आरोपी मुक्ताईनगर (जि.जळगाव) येथील असून त्या भागात त्यांनी रोड रॉबरीचे अनेक गुन्हे केले आहे. १५ ते २० दिवसांपासून आरोपी आपल्या कुटुंबासह केळापूरनजीक ताडपत्रीचा पाल टाकून वास्तव्यास आहे. सुनसान जागी राष्ट्रीय महामार्गावर रात्री १२ वाजतानंतर उभ्या असलेल्या ट्रकच्या कॅबीनमध्ये घुसायचे व चाकूच्या धाकावर ट्रकचालकास लुटायचे. असा प्रकार गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सुरू होता. आत्तापर्यंत त्यांनी राष्ट्रीय महामार्गावरील टोल-बुथ व केळापूर दरम्यान तीन-चार ट्रकचालकांना लुटले. परंतु त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली नाही. गेल्या १२ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास टोल बुथजवळ रस्त्याच्या बाजूने उभ्या असलेल्या ट्रकचालकास चाकूच्या धाकावर लूटले होते. ट्रकचालकाने घटनेची फिर्याद पांढरकवडा पोलीस ठाण्यात दिली होती. तेव्हापासून पोलीस या लुटारूंच्या शोधात होते. सोमवारपासून पोलीस दररोज रात्री या भागात आरोपीच्या शोधासाठी सापळे रचून होते. गुरूवारी रात्री सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद पिदुरकर आपल्या सहकाऱ्यासह राष्ट्रीय महामार्गावरील टोल बुथ ते केळापूर दरम्यान गस्तीवर असताना त्यांना पेट्रोल पंपाजवळ तीघेजण संशयीतरित्या फिरताना आढळून आले. त्यांनी पोलीस ठाण्यात फोन करून अधिक कर्मचारी बोलावून घेतले.
त्या तिघाही संशयिताची विचारपूस केली असता, त्यांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलीस उपनिरीक्षक मंगेश भोंगाडे त्यांना पकडण्यासाठी त्यांच्यामागे पळाले असता, आरोपी दिलीप पवारने त्यांच्यावर चाकूने हल्ला चढविला. दुसरा आरोपी श्यामपाल पवार याने सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद पिदुरकर यांच्यावर दगडाने हल्ला केला. परंतु अशाही परिस्थितीत त्यांनी दोन्हीही आरोपींना पकडले. तिसरा आरोपी मात्र फरार होण्यास यशस्वी झाला. आरोपींवर जवळपास जिल्ह्यात खून, दरोडे, चोºया असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलीस निरीक्षक असलम खान यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.