पाच महिन्यांपासून रस्त्याचे काम रखडले; नागरिक त्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 06:09 PM2024-10-22T18:09:00+5:302024-10-22T18:09:43+5:30
अपघाताची भीती : दगडाच्या ढिगामुळे वाहतुकीला अडथळा
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : नगर परिषद हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते नेताजी सुभाषचंद्र बोस चौकापर्यंत गेल्या पाच ते सहा महिन्यांपूर्वी रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे गरजेचे होते. परंतु संबंधित विभागाने या रस्त्याच्या विकास कामाकडे दुर्लक्ष केले. यामुळे कंत्राटदाराने रस्त्याचे काम धिम्यागतीने सुरू केले. निधी मंजूर असतानाही काम होत नसल्याने सणासुदीच्या दिवसात शहरवासीयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते नेताजी सुभाषचंद्र बोस चौकापर्यंत मुख्य रस्त्याचे काम गेल्या सहा महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले. त्यावेळी पेरणीचे दिवस असताना हे काम सुरू केल्याने व्यापारी, शेतकरी व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. हा रस्ता शहरातील मुख्य रस्ता असल्याने या नेहमी रहदारी असते. या रस्त्यावर अनेक कृषी केंद्र, दवाखाने, हार्डवेअर, बँका, ग्रेन मार्केट, कापड दुकाने आदी दुकाने आहेत. यामुळे या मार्गावर कायम वर्दळ असते. संबंधित कंत्राटदाराने ऐन सणासुदीच्या दिवसात पुन्हा या रस्त्याच्या कामास सुरुवात केली आहे. रस्त्यावर मोठ मोठे दगडाचे ढीग डंपर मधून आणून व्यापाऱ्यांच्या दालनासमोर टाकले आहे. दगडाचे ढीग रस्त्यावर पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. या रस्त्यातून मार्ग काढताना दुचाकी आणि चारचाकी चालकांना तारेवरची कसत करावी लागत आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे नगरपरिषदेने वेळेत लक्ष देणे गरजेचे असून संभाव्य अपघात झाल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला. यापूर्वी या रस्त्याच्या कामामुळे नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. या रस्त्याच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याने पावसाळ्यापूर्वी अपेक्षित खडीकरण व अंतिम टप्प्यातील काम पूर्ण झाले नाही. याचा त्रास या भागातील नागरिकांना सोसावा लागत आहे.