शंभर कोटींच्या रस्ते-पुलांची कामे निविदेच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 11:33 PM2019-01-15T23:33:01+5:302019-01-15T23:33:43+5:30
जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम खात्यांतर्गत सुमारे १०० कोटी रुपयांच्या रस्ते व पुलांची कामे होणार असून त्याच्या निविदा जारी होण्याची प्रतीक्षा आहे. कंत्राटदारांच्या बहिष्कारामुळे या निविदांना विलंब होत असल्याचे बांधकाम अभियंते सांगत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम खात्यांतर्गत सुमारे १०० कोटी रुपयांच्या रस्ते व पुलांची कामे होणार असून त्याच्या निविदा जारी होण्याची प्रतीक्षा आहे. कंत्राटदारांच्या बहिष्कारामुळे या निविदांना विलंब होत असल्याचे बांधकाम अभियंते सांगत आहेत. तर शेजारील जिल्ह्यात नवे ‘सीएसआर’ अपडेट झाले असताना यवतमाळ जिल्ह्यातच अद्याप निविदा का नाही, असा प्रश्न उपस्थित करून कंत्राटदार मंडळी अभियंत्यांच्या कार्यतत्परतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहे.
१० मार्च दरम्यान लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी सर्व शासकीय सोपस्कार उरकून विकास कामे मार्गी लावण्याचा यंत्रणेचा प्रयत्न आहे. त्यासाठी राजकीय नेते मंडळी, लोकप्रतिनिधीही आग्रही आहेत. शासनाच्या सर्वच विभागात आचारसंहितेपूर्वी वर्कआॅर्डर जारी करण्यासाठी धडपड सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यांतर्गत बजेट, सीआरएफ, लेखाशिर्ष २५-१५ आदी अंतर्गत रस्ते व पुलांसाठी शंभर कोटीपेक्षा अधिक रकमेची कामे केली जाणार आहे. मात्र या कामांना विलंब होत असल्याने कंत्राटदारांमध्ये नाराजीचा सूर पहायला मिळतो आहे. अद्याप निविदा काढल्या गेल्या नाही. त्यामुळे पुढील प्रक्रिया केव्हा पूर्ण होणार व वर्क आॅर्डर केव्हा जारी होणार असा सवाल कंत्राटदार विचारत आहेत. नवे ‘सीएसआर’ (बांधकाम साहित्याचे शासकीय दर) जारी झाले आहे. त्यानुसार दर अपडेट करून अनेक जिल्ह्यात निविदा काढल्या गेल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यात मात्र अद्याप शंभर कोटींपेक्षा अधिक रकमेच्या कामांच्या निविदांची कंत्राटदारांना प्रतीक्षा आहे. या विलंबाला कंत्राटदारांचा शासकीय निविदांवरील बहिष्कार कारणीभूत असल्याचे बांधकाम खात्याकडून सांगितले जात आहे. दिवाळीपर्यंत या कंत्राटदारांचा बहिष्कार होता. नवे ‘सीएसआर’ जारी झाल्यानंतर त्यांनी आपली मते नोंदविली. त्यानुसार आवश्यक ते बदल करून पुढील कार्यवाही नियमानुसार केली जात असल्याचे सांगितले गेले.
‘सीएमजीएसवाय’मध्ये निविदा केव्हा उघडणार ?
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत जिल्ह्यात सुमारे १०० कोटी रुपयांची कामे केली जाणार आहे. त्याच्या निविदा महिनाभरापूर्वी काढल्या गेल्या. या निविदा कंत्राटदारांनी भरल्यासुद्धा. मात्र अद्याप या निविदा उघडल्या गेल्या नाही. त्या तातडीने उघडाव्या यासाठी कंत्राटदारांची धडपड सुरू आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या निविदा अद्याप उघडल्या नसल्या तरी काही कंत्राटदार आपल्याला एकापेक्षा अनेक कामे मिळणार असल्याचे सांगत आहेत. पुसद विभागातील एका तरुण कंत्राटदाराची सुमारे १५ ते २० कोटींची पाच ते सहा कामे आहेत. मात्र त्यातील पुलाचे एक काम पावणे तीन वर्ष लोटूनही कमी झाली नाही. वास्तविक या कामासाठी एक वर्षाचीच मुदत होती. मंदगतीने हे काम सुरू असल्यानंतरही बांधकाम अभियंते या कंत्राटदारावर मेहेरबान आहेत.