लाखोंच्या खर्चानंतरही रस्ते खिळखिळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 09:59 PM2019-04-25T21:59:13+5:302019-04-25T21:59:39+5:30
शहरातील मुख्य रस्ते खाचखळग्यांनी खिळखिळे झाले आहे. रस्त्यांच्या डागडुजीसाठी लाखोंचा खर्च होत आहे. तरी शहरातील रस्ते अजूनही दुरूस्तीच्या प्रतीक्षेत आहे. रस्ते दुरूस्त न झाल्याने दररोज अपघात होत आहेत. यानंतरही नगरपरिषद प्रशासनाला उसंत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरातील मुख्य रस्ते खाचखळग्यांनी खिळखिळे झाले आहे. रस्त्यांच्या डागडुजीसाठी लाखोंचा खर्च होत आहे. तरी शहरातील रस्ते अजूनही दुरूस्तीच्या प्रतीक्षेत आहे. रस्ते दुरूस्त न झाल्याने दररोज अपघात होत आहेत. यानंतरही नगरपरिषद प्रशासनाला उसंत नाही.
शहरामध्ये लगतचा ग्रामीण भाग विलीन झाला, तेव्हापासून रस्त्याकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. मुख्य रस्ते अनेक कोट टाकून मजबूत होत आहे. याचवेळी शहरातील खिळखिळे रस्ते दुरूस्तीकडे दुर्लक्ष झाले आहे.
सत्यनारायण ले-आऊट, शिंदे प्लॉट, सिंघानियानगर, वाघापूर रोड, राऊतनगर, रंभाजीनगर, सानेगुरूजीनगर, संकटमोचन, माळीपुरा, पाटीपुरा, कारागृहालगतचा भाग, आर्णी रोडचा काही पॅच अजूनही नादुरूस्त आहे.
विशेष म्हणजे, हे सर्व रस्ते अत्यंत वर्दळीचे आहे. या ठिकाणची असलेल्या खाचखळग्यामुळे सारखे अपघात घडत आहेत. स्पाँडेलाईटीससारख्या आजारांसोबत वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अनेकांना रूग्णालयात भरती व्हावे लागले. यानंतरही शहरातील विविध रस्त्यांच्या डागडुजीचा विचार प्रशासनाने अद्यापही केलेले नाही.
नगरपरिषदेला इतर रस्ते दिसत नाही का?
नगरपरिषद प्रशासनाने एकाच रस्त्यावर अनेकदा ‘कोट’ टाकून ते मजबूत करीत आहे. तर दुसरीकडे काही रस्ते वर्षानुवर्षांपासून नादुरुस्त आहेत. प्रशासनाला इतर नादुरुस्त दिसत नाही का, असा प्रश्न संतप्त नागरिक विचारत आहेत. एकाच रस्त्यावर भर देण्यापेक्षा शहरातील अत्यंत दैनावस्था झालेल्या इतरही रस्त्यांवरील खाचखळगे दुरुस्त करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. मात्र नगरपरिषद प्रशासन हा विषय किती गांभीर्याने घेते, यावरच संपूर्ण बाब अवलंबून राहणार आहे.