बेंबळासाठी रस्ते खोदले, बुजविणार कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2020 05:00 AM2020-09-01T05:00:00+5:302020-09-01T05:00:42+5:30
अमृत’च्या पाईपलाईनचा कंत्राट नाशिकच्या कंपनीला मिळाला असला तरी, प्रत्यक्षात त्यांनी यवतमाळात बहुतांश कामांचे तुकडे पाडून उपकंत्राटदार नेमले आहेत. हे कंत्राटदार चक्क राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत. नेत्याच्या सूचनेवरून त्यांना ही कामे मिळाली आहेत. नेते पाठीशी असल्याने हे उपकंत्राटदार कुणालाही जुमानत नाही. विशेष असे, या उपकंत्राटदारांची नावे अथवा यादीही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अमृत योजनेंतर्गत शहरात सर्वत्र बेंबळा धरणावरून पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी खोदकाम केल्यानंतर तो रस्ता पूर्वीप्रमाणे करून देण्याचे बंधन कंत्राटदारावर आहे. त्यासाठी नियमानुसार शासनाने निविदेमध्ये रक्कम समाविष्ट केली आहे. प्रत्यक्षात शहरात रस्ते खोदले गेले, परंतु ते बुजविण्याची तसदी कंत्राटदारांनी घेतली नाही. या कारणावरून अनेक ठिकाणी वादही झाले. मात्र कंत्राटदारांनी रस्ते बुजविण्यास स्पष्ट नकार दिला.
अमृत’च्या पाईपलाईनचा कंत्राट नाशिकच्या कंपनीला मिळाला असला तरी, प्रत्यक्षात त्यांनी यवतमाळात बहुतांश कामांचे तुकडे पाडून उपकंत्राटदार नेमले आहेत. हे कंत्राटदार चक्क राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत. नेत्याच्या सूचनेवरून त्यांना ही कामे मिळाली आहेत. नेते पाठीशी असल्याने हे उपकंत्राटदार कुणालाही जुमानत नाही. विशेष असे, या उपकंत्राटदारांची नावे अथवा यादीही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे नाही. यावरून प्राधिकरणाच्या एकूणच कामकाजाचा अंदाज येतो. प्राधिकरण या उपकंत्राटदारांवर पूर्णपणे मेहेरबान असल्याचे स्पष्ट होते. या उपकंत्राटदारांच्या योजनेच्या नावाने रस्ते खोदून ते न बुजविण्याच्या कारनाम्यामुळे त्यांना काम देवून उत्पन्नाचा सोर्स निर्माण करणाऱ्या नेत्याविरूद्धच जनतेची नाराजी होत आहे. या नेत्याविरूद्ध जनतेत तीव्र रोष पाहायला मिळत आहे. नेता मात्र विकास हवा असेल तर थोडा त्रास सोसावाच लागेल, असे म्हणून अप्रत्यक्षरित्या उपकंत्राटदार असलेल्या कार्यकर्त्यांची पाठराखण करताना दिसतो आहे.
करारानुसार शहरवासीयांना बेंबळा प्रकल्पाचे पाणी मिळण्यास वर्षभरापूर्वीच सुरुवात व्हायला पाहिजे होती. (योजना पूर्ण करण्याचा कालावधी २७ ऑक्टोबर २०१९ रोजीच संपला आहे) मात्र फुटलेल्या एक हजार एमएमच्या पाईपनेच या योजनेच्या कामाचा दर्जा उघडा झाला. अजूनही बहुतांश कामे सुरू आहे. यातीलच शहरात घरगुती नळ देण्यासाठीच्या पाईपलाईन अस्तरीकरणाचे काम आहे. यासाठी गुळगुळीत रस्ते फोडले जात आहे. पाण्यापावसाचा कुठलाही विचार न करता जेसीबीने होणारे खोदकाम त्रासदायक ठरत आहे.
काँक्रिटचे मजबूत रस्ते विद्रुप करण्यात आले. खोदकामानंतर रस्ता दुरुस्त करून देण्याची जबाबदारी मजीप्राची पर्यायाने कंत्राटदारांची आहे. मात्र खोदकाम करून गेलेल्या कंत्राटदारांचा चेहरा दुसऱ्यांदा दिसत नाही. खोदलेला परिसर सततच्या पावसामुळे चिखलमय झालेला आहे. तेथून ना धड पायदळ चालता येते ना वाहन काढता येत. उपकंत्राटदारांकडे संपूर्ण कामे सोपवून मुख्य कंत्राटदार बिनधास्त झाले आहे. नाशिकच्या पी.एल. आडके या कंपनीकडे या योजनेचे काम आहे. त्यांनी यवतमाळ उपकंत्राटदारांकडे एवढी मोठी योजना सोपविली आहे.
डांबरी रस्ते दुरुस्तीची तरतुद नाही, काँक्रिटची मात्र आहे
पाईपलाईनसाठी डांबरी रस्ते फोडल्यास ते दुरुस्त करण्याची तरतूद नाही. वास्तविक शहरात सर्वाधिक रस्ते डांबरीकरण झालेले आहे. काँक्रिट रस्त्याची केवळ डागडुजीची तरतूद आहे. तीसुद्धा करून दिली जात नाही. गुळगुळीत रस्ते, लावलेली झाडे निर्दयपणे फोडले-तोडले जातात. पण, सुस्थितीत आणण्याचे सौजन्य या कंत्राटदारांकडून दाखविले जात नाही.
शहरात ५०० किलोमीटर पाईपलाईन
अमृत योजनेंतर्गत यवतमाळ शहरात जवळपास ५०० किलोमीटर एवढी पाईपलाईन टाकली जाणार आहे. सद्यस्थितीत ४५० किलोमीटर एवढे पाईप अस्तरीकरण झाले आहे. याकरिता चांगले रस्ते फुटणार हे जवळपास निश्चित आहे. पाईपलाईन टाकण्यासाठी पर्याय असतानाही चांगला रस्ता फोडण्याचा आग्रहच कंत्राटदारांचा असतो. लोकांनी सांगूनही उपयोग होत नाही.
खोदकामानंतर कुठले रस्ते चांगले झाले नाही याची पाहणी केली जाईल. कंत्राटदारांकडून अशा रस्त्यांची दुरुस्ती करून घेण्यात येईल.
- सुरेश हुंगे, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, यवतमाळ