पुसदचे रस्ते झाले मोकळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 11:59 PM2019-01-16T23:59:00+5:302019-01-16T23:59:19+5:30

शहरातील छत्रपती शिवाजी चौक ते नाईक बंगला रस्त्यावरील फुटपाथवरील अतिक्रमण बुधवारी हटविण्यात आले. यामुळे या रस्त्याने तूर्तास मोकळा श्वास घेतला. या मार्गावर अनेक दुकानदारांनी अतिक्रमण करून रस्त्याची कोंडी केली होती.

The roads of Pusad are free | पुसदचे रस्ते झाले मोकळे

पुसदचे रस्ते झाले मोकळे

Next
ठळक मुद्देअतिक्रमण हटाव : शिवाजी चौक ते बंगल्यापर्यंत मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : शहरातील छत्रपती शिवाजी चौक ते नाईक बंगला रस्त्यावरील फुटपाथवरील अतिक्रमण बुधवारी हटविण्यात आले. यामुळे या रस्त्याने तूर्तास मोकळा श्वास घेतला.
या मार्गावर अनेक दुकानदारांनी अतिक्रमण करून रस्त्याची कोंडी केली होती. या अतिक्रमणावर बुधवारी बुलडोझर चालविण्यात आला. शहरातून यवतमाळकडे राज्य मार्ग जातो. या मार्गावर महात्मा फुले चौक, बसस्थानक परिसर, छत्रपती शिवाजी चौक आदी ठिकाणी अनेक दुकानदारांनी आपली दुकाने थाटून अतिक्रमण केले होते. त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत होती. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा वाहतूक शाखा व नगर परिषदेने संयुक्तपणे अतिक्रमण हटाव मोहीम राबविली.
यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. या मार्गावरील जवळपास शंभर अतिक्रमणे हटविण्यात आल्याने या रस्त्याने मोकळा श्वास घेतला. अतिक्रमण हटाव मोहीमेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी प्रकाश झळके, अभियंता ए.आर. राठोड व त्यांचे पथक, नगरपरिषद आरोग्य विभागाचे निरीक्षक सुभाष राठोड, बांधकाम विभागाचे अभियंता दिनेश राठोड, महावितरणचे साहेबराव भुरके व त्यांचे पथक, जिल्हा पोलीस वाहतूक शाखेचे एपीआय धीरज चव्हाण व त्यांचे पथक सहभागी होते. रस्ता रुंदीकरण व सिमेंटीकरण होणार असल्याने अतिक्रमण हटविण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. आता नागरिकांना रस्त्याच्या सिमेंटीकरणाची प्रतीक्षा आहे.

नोटीस देऊनही तसदी नाही
सर्व दुकानदारांना दोन दिवसांपूर्वीच अतिक्रमण काढण्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती. मात्र अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण काढण्याची कोणतीही तसदी घेतली नाही. त्यामुळे बुधवारी अखेर फुटपाथवरील अतिक्रमणावर थेट बुलडोझर चालविण्यात आला.

Web Title: The roads of Pusad are free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.