रात्रगस्तीसाठी रस्ते पोलिसांच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 05:00 AM2020-08-21T05:00:00+5:302020-08-21T05:00:02+5:30
बुधवारी रात्री ११.३० ते १२.३० या वेळेत ‘लोकमत’ प्रतिनिधीने शहराचा फेरफटका मारला असता कुठेही यंत्रणा रस्त्यावर दिसली नाही. पोलिसांच्या रात्रगस्तीचे रिअॅलिटी चेक करण्यासाठी वडगाव ग्रामपंचायतपासून सुरुवात केली. आर्णी मार्गावर कुठेही पोलीस अथवा त्यांचे वाहन आढळले नाही. आर्णी नाक्यावर फिक्स पॉर्इंट असतो. बुधवारी रात्री मात्र तेथे एकही पोलीस कर्मचारी आढळून आला नाही.
यवतमाळ : शहरातील मालमत्तेचे गुन्हे नियंत्रित करण्यासाठी पोलीस गस्त महत्त्वाची आहे. प्रत्येकच पोलीस ठाण्यात रात्री १० वाजता रोलकॉल घेऊन गस्तीचे नियोजन केले जाते. पोलीस ठाण्यातील मुन्शीकडे मनुष्यबळाची विभागणी करून ड्यूटीचे नियोजन करण्याची जबाबदारी असते. याशिवाय स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, मुख्यालयातील अधिकारी, कर्मचारी या सर्वांवर गस्तीची जबाबदारी आहे. बुधवारी रात्री ११.३० ते १२.३० या वेळेत ‘लोकमत’ प्रतिनिधीने शहराचा फेरफटका मारला असता कुठेही यंत्रणा रस्त्यावर दिसली नाही.
पोलिसांच्या रात्रगस्तीचे रिअॅलिटी चेक करण्यासाठी वडगाव ग्रामपंचायतपासून सुरुवात केली. आर्णी मार्गावर कुठेही पोलीस अथवा त्यांचे वाहन आढळले नाही. आर्णी नाक्यावर फिक्स पॉर्इंट असतो. बुधवारी रात्री मात्र तेथे एकही पोलीस कर्मचारी आढळून आला नाही. बुधवारी रात्री ११ वाजता जोरदार पाऊस कोसळला. नंतर ११.३० वाजतापासून पाऊस थांबला होता.
प्रमुख चौक व रस्ते सुनसान
शहरातील आर्णी नाका, बसस्थानक चौक, दत्त चौक, नेताजी चौक, नेताजी मार्केट, संत सेना चौक येथून तहसील चौक, पाच कंदील चौक, शारदा चौक, कळंब चौक, आंबेडकर चौक, गांधी चौक, सराफा लाईन, हनुमान आखाडा चौक, पोस्ट आॅफिस चौक, स्टेट बँक चौक, एलआयसी चौक, तिरंगा चौक अशा सर्वच प्रमुख चौकातून व रस्त्यांनी फेरफटका मारला.
क्यूआर कोड स्कॅनिंग थंड बस्त्यात
अपर पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी पोलिसांच्या रात्रगस्तीवर वॉच ठेवण्यासाठी क्यूआर कोड स्कॅनिंगची व्यवस्था केली होती. संबंधित पोलीस शिपायाने त्या पॉर्इंटवर जावून तो कोड स्कॅन करणे, सेल्फी पाठविणे याप्रकारे वॉच ठेवला जात होता. परंतु रस्त्यावर गस्तीसाठी नसलेला एकही पोलीस पाहता हा प्रकार थंडावल्याचे दिसते.
गस्त रजिस्टर नोंद ठरली निष्प्रभ
पारंपरिक गस्त रजिस्टर नोंदीची पद्धतही कायम आहे. ज्याठिकाणी गस्त करायची आहे. त्याजागेवर नोंदीसाठी रजिस्टर ठेवले असते. यामध्येही संबंधिताला जावून स्वाक्षरी करणे अपेक्षित आहे. मात्र रजिस्टरचा फारसा प्रभाव गस्त नियमित करण्यामध्ये झाला नाही. बुधवारी रात्री केलेल्या रिअॅलिटी चेकमध्ये गस्तीचे वास्तव उघड झाले.
दुपारी व्हीआयपी बंदोबस्त, रात्री रिलॅक्स
उलट बुधवारी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस शहरात आले होते. त्यांचा तीन तासांचा दौरा होता. दुपारच्या बंदोबस्तानंतर पोलीस यंत्रणा रिलॅक्स झाली. रात्री पोलीस गस्त दिसली नाही. पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या बाजूलाही दरोडा नियंत्रण पथकाच्या वाहनासह पोलीस लॉरी उभ्याच दिसल्या.
पोळ्याच्या करीलाच शहराची सुरक्षा वाऱ्यावर
बुधवार हा पोळ्याच्या करीचा दिवस. या दिवशी सर्वच जण वेगळ्या रंगात असतात. त्यामुळे अनेकदा कायदा व सुव्यवस्था निर्माण होण्याची स्थिती असते. याच काळात दारू तस्करी मोठ्या प्रमाणात चालते. ठिकठिकाणी जुगार अड्डे बहरलेले असतात. तस्करीची वाहनेही बाहेर निघतात. दारू पिवून धिंगाणा घालणे, शस्त्रे चालविणे, शरीरासंबंधीचे गुन्हे हमखास घडतात. गेल्या २४ तासात जिल्ह्यात अशा १२ गुन्ह्यांची नोंद पोलीस दप्तरी झाली आहे. नियमित चोऱ्या-घरफोड्यांसह अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी किमान करीच्या दिवशी तरी रात्री प्रमुख मार्गांवर तगडा पोलीस बंदोबस्त असणे अपेक्षित असते. परंतु प्रत्यक्षात करीच्या दिवशीही कुणीच पोलीस रात्री गस्तीसाठी रस्त्यावर उतरले नसल्याचे दिसून आले. केवळ तुरळक वाहनांचे तेवढे दर्शन झाले. यावरून इतर सामान्य दिवशी पोलिसांच्या रात्रगस्तीची काय स्थिती राहात असेल, याचा अंदाज येतो. त्यातूनच चोरीच्या घटना वाढत असल्याचेही स्पष्ट होते.
जुगारासाठी चक्क धार्मिक स्थळाचा आडोसा
आर्णी रोडवर तर एका धार्मिक स्थळाच्या आडोशाने सायंकाळी ७ वाजता जुगाराचा श्रीगणेशा होतो. पहाटे ३ वाजेपर्यंत जुगार चालतो. एक सुरक्षा रक्षक त्यासाठी पुढाकार घेऊन आपले ‘आरोग्य’ धोक्यात घालतो. अशाच पद्धतीने शहरात अनेक भागात जुगार चालतात. पोळ्याच्या करीचे औचित्य साधून तर ठिकठिकाणी व जागा मिळेल तिथे लहान-मोठे जुगार भरविले जातात. मात्र सणातील परंपरा असे म्हणून पोलीस यंत्रणा त्याकडे दुर्लक्ष करते. त्यामुळेच की काय आता जुगारासाठी चक्क धार्मिक स्थळाचाही आधार घेतला जात असल्याचे आढळून आले.