रस्त्यालगतची झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 10:06 PM2018-05-03T22:06:18+5:302018-05-03T22:06:18+5:30
पांढरकवडा ते यवतमाळ मार्गावरील हिरवीकंच उभी झाडे भर दुपारी पेटविली जात असून आग लावणाऱ्याविरूद्ध कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे महामार्गावरील आजुबाजूला असलेली डौलदार झाडे आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : पांढरकवडा ते यवतमाळ मार्गावरील हिरवीकंच उभी झाडे भर दुपारी पेटविली जात असून आग लावणाऱ्याविरूद्ध कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे महामार्गावरील आजुबाजूला असलेली डौलदार झाडे आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
सध्या उन्हाचा पारा वाढत असून दुपारी १२ वाजताच्यानंतर सूर्य आग ओकत असल्याने एकीकडे असह्य वेदना होत आहे. दुसरीकडे शांत सावली देणारी झाडे मात्र नष्ट होत आहेत. पांढरकवडा-यवतमाळ या राज्य मार्गावर दोन्ही बाजूला असलेली कडूनिंबाची मोठमोठी झाडे रोज जळताना दिसत आहे. त्यात सामाजिक वनीकरण विभागाने लावलेले नवीन वृक्ष जळून खाक होत आहे. शासन कोट्यवधी रूपये खर्च करून दरवर्षी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबविते. परंतु तेच वृक्ष मोठे झाले की, ती अज्ञात इसमाकडून तोडली जातात. यावर कुणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. भर दुपारी झाडांच्या बुंध्याला आग लागून ते जमीनदोस्त करण्यात येते. त्यानंतर ते इंधन म्हणून वापरात आणले जाते. हे वृक्ष रात्रीच तोडून नेले जातात. अनेक ठिकाणी हा प्रकार सर्रास सुरू असून यामुळे वृक्ष नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. असाच प्रकार सुरू राहिल्यास रस्त्याच्या आजुबाजूने कुठेही वृक्ष दिसणार नाही व उभे राहण्यासाठी सावलीसुद्धा मिळणार नाही.
कारवाई केव्हा होणार?
पांढरकवडा-यवतमाळ या रस्त्यासह विविध मार्गावर झाडे तोडणारी टोळी सक्रिय असून ही टोळी अनेक मार्गावरील झाडांना आग लावत आहे. रात्री झाडे जमिनदोस्त झाल्यानंतर राहिलेले खोड तोडून नेतात. त्यामुळे आतापर्यंत अनेक झाडे नष्ट झाली आहेत. पोलिसांनी व सार्वजनिक बांधकाम विभागाने या टोळीचा शोध घेऊन त्यांच्याविरूद्ध कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.