वणीत दरोड्याचा प्रयत्न फसला; शहरात दहशतीचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2024 08:03 PM2024-09-05T20:03:34+5:302024-09-05T20:04:16+5:30

दरोडेखोरांच्या शिरावर हेल्मेट :

robbery attempt failed in vani an atmosphere of terror in the city | वणीत दरोड्याचा प्रयत्न फसला; शहरात दहशतीचे वातावरण

वणीत दरोड्याचा प्रयत्न फसला; शहरात दहशतीचे वातावरण

संतोष कुंडकर, वणी (यवतमाळ) : येथील प्रगतीनगरमध्ये बुधवारी मध्यरात्रीनंतर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या दरोडेखोरांना घरातील मुलीने आरडाओरड केल्याने पळ काढावा लागला. हाती लोखंडी सळाखी घेऊन घरात शिरलेले हे दरोडेखोर डोक्यावर हेल्मेट घालून होते. हे सर्वजण एका व्हॅनने दरोडा टाकण्यासाठी आले होते.

दरम्यान, या प्रकरणी तक्रार होताच, पोलिसांनी शोध मोहिम हाती घेतली. यवतमाळचे अपर पोलिस अधीक्षक पियूष जगताप, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक ज्ञानोबा देवकते यांनी वणीत येऊन घटनास्थळाला भेट दिली. घटनास्थळावर श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. प्रगतीनगरमधील रहिवासी सुभाष डोर्लिकर हे बुधवारी रात्री त्यांच्या निवासस्थानात खालच्या बेडरूममध्ये झोपून होेते, तर त्यांची मुलगी डॉ.कांचन डोर्लीकर ही वरच्या माळ्यावर असलेल्या बेडरूममध्ये झोपून होती. मध्यरात्रीनंतर २.३७ मिनिटांनी संख्येने सहा असलेल्या दरोडेखोरांनी वरच्या माळ्यावर चढून सर्वप्रथम मुलगा भूषण याच्या बेडरूममध्ये प्रवेश केला.

भूषण हा सध्या पुण्यात शिक्षण घेत असल्याने त्याच्या बेडरूममध्ये दरोडेखोरांना काहीही हाती लागले नाही. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा बाजुलाच असलेल्या डॉ.कांचन हिच्या बेडरूमकडे वळविला. या दरोडेखोरांनी बेडरूमचे दार तोडण्याचा प्रयत्न केला. दार तोडताना आवाज झाल्याने डॉ. कांचनला जाग आली. काही तरी विपरीत घडणार असल्याची शंका येताच, तिने जोरजोराने आरडाओरड सुरू केली. प्रसंगावधान राखून तिने पुण्यात असलेला भाऊ भूषणला तातडीने फोन करून घडत असलेल्या घटनेची माहिती दिली. भूषणनेही वेळ न घालविता, प्रगतीनगरमधील त्याच्या मित्रांना फोन करून याबाबत माहिती दिली.

माहिती मिळताच, त्याचे मित्र डोर्लीकर यांच्या घराजवळ पोहोचले. ही बाब दरोडेखारांच्या लक्षात येताच, त्यांनी चपळाईने तेथून पळ काढत व्हॅनजवळ पोहोचले आणि त्यांनी पोबारा केला. यादरम्यान, तब्बल १९ मिनिटे ते डोर्लीकर यांच्या घरात होते. या घटनेनंतर सुभाष डोर्लीकर यांनी वणी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. या प्रकरणी बीएनएस कलम ३१० (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास वणीचे एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अनिल बेहराणी व त्यांचे सहकारी करीत आहेत.

दरोडेखोर सीसीटिव्हीत कैद

घटनेनंतर पोलिसांनी डोर्लीकर यांच्या घरी लावलेले व मार्गाने असलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली. त्यात दरोडेखोर कैद झाल्याचे दिसून आले. दरोडा टाकण्यासाठी आणलेली व्हॅनही फुटेजमध्ये दिसत आहे. या व्हॅनला नंबर नसल्याचे दिसून आले.

१५ दिवसात दुसरी घटना

यापूर्वी १९ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास येथील मोबाईल शॉपी चालक अंकुश बोढे यांना वसंत गंगाविहारच्या गेटजवळ लुटण्यात आले होते. त्याच्याजवळील सहा लाखांची रक्कम या लुटारूंनी लंपास केली होती. पोलिसांनी तपासचक्रे वेगाने फिरवून आरोपींना अटक केली होती. मात्र सातत्याने वणी शहरात घडत असलेल्या अशा गंभीर घटनांमुळे वणी शहरात दहशतीचे वातावरण पसरले असून पोलिसांची दहशत संपली की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Web Title: robbery attempt failed in vani an atmosphere of terror in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.