खडका गाव कोरोनापासून चार हात दूरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:25 AM2021-07-05T04:25:50+5:302021-07-05T04:25:50+5:30
ज्ञानेश्वर ठाकरे महागाव : दोन वर्षापासून कोरोनाने अख्या जगाला सळो की पळो करून सोडले. मात्र, तालुक्यातील खडका गावाने कोरोनालाच ...
ज्ञानेश्वर ठाकरे
महागाव : दोन वर्षापासून कोरोनाने अख्या जगाला सळो की पळो करून सोडले. मात्र, तालुक्यातील खडका गावाने कोरोनालाच पळवून लावले. या गावाने कोरोनाला वेसही ओलांडू दिली नाही. दोन वर्षापासून कोरोना जगात धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे सतत लॉकडाऊन होत आहे. अनेक निर्बंध लादले जात आहे. शासनाने घालून दिलेल्या निर्बंधांची अमलबजावणी करूनच या गावातील नागरिकांनी कोरोनाला चार हात दूर ठेवले आहे. गावातील कोरोना नियोजन समितीने केलेल्या कार्याचा सर्वांनीच आदर्श घ्यावा, असे काम समितीने केले आहे.
या गावातील एकाही नागरिकाला कोरोनाचा संसर्ग झाला नाही. यात ग्रामस्थांनी समितीला सहकार्य केले. समितीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले. आता खडका ग्रामपंचायतीच्या कार्याची जिल्हा प्रशासनाने दखल घेतली. नुकतीच गावात एक डाॅक्युमेंटरी तयार करण्यात आली. तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतींपैकी खडका आदर्श ग्रामपंचायत म्हणून नावारूपास आली आहे. विजयराव देशमुख, डॉ. राजेंद्र पुरोहित, दत्तराव कदम, डॉ. संदीप शिंदे, सरपंच संदीप कानडे, सचिव एस.आर. देशमुख, तलाठी यू.व्ही. व्हर, बळवंत चौरे, नितीन ठोके, स्वयंसेविका आम्रपाली गायकवाड, आरोग्य सेविका रुपाली कागदे, सुधा खडसे, संजय वाघमारे, विलास देशमुख, दशरथ मारटकर, प्रल्हाद गोस्वामी, राहुल भामकर यांचा नियोजन समितीत समावेश आहे. समितीच्या कार्यात ग्रामस्थांचा मोठा वाटा आहे.
बॉक्स
गावात ७० टक्के लसीकरण
कोरोणा काळात खडका गावात ७० टक्के लसीकरण झाले आहे. यात ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने लसीकरण करून घेतले आहे. ग्रामपंचायत नियोजन समितीने यासाठी मोठी मेहनत घेतली. त्यामुळे तिसऱ्या लाटेतसुद्धा खडाका गावात कोरोनाचा संसर्ग होणार नाही, याची आम्हाला खात्री असल्याचे गटविकास अधिकारी मयूरकुमार अंदेलवाड यांनी सांगितले.
कोट
खडका येथे मागील वर्षी व यावर्षीच्या लाटेत एकही कोरोना बाधित रुग्ण आढळला नाही. ग्रामपंचायत व नागरिकांचे सहकार्य कोरोनावर मात करणारे ठरले. अन्य ग्रामपंचायतींनी खडका ग्रामपंचायतीचा आदर्श घ्यावा.
डॉ. जब्बार पठाण, तालुका आरोग्य अधिकारी, महागाव