घाटंजी तालुक्यात रोही, रानडुकरांचा हैदोस
By admin | Published: September 18, 2015 02:26 AM2015-09-18T02:26:39+5:302015-09-18T02:26:39+5:30
आर्थिक अडचणीवर मात करूनही यावर्षी शेतकऱ्यांनी पेरणी केली. त्यांच्या हिंमतीचा परिपाक म्हणजे,
शेतकरी बेजार : ज्वारी, सोयाबीन, कापसाला फटका, वनविभागाने लक्ष देण्याची गरज
घाटंजी : आर्थिक अडचणीवर मात करूनही यावर्षी शेतकऱ्यांनी पेरणी केली. त्यांच्या हिंमतीचा परिपाक म्हणजे, बेभरवशाच्या पावसातही यंदा पिकांची परिस्थिती समाधानकारक आहे. मात्र, वन्यप्राण्यांनी आता हाती आलेले पीक उद्ध्वस्त करणे सुरू केले आहे. त्यामुळे तालुकाभरातील शेतकरी कमालीचे हवालदिल झाले आहे.
तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून रोही आणि रानडुकरांनी अक्षरश: हैदोस घातला आहे. प्रामुख्याने मानोली, पाटापांगरा, शिरोली, दहेगाव, उंदरणी, जुनोनी, आमडी, पंगडी आदी परिसरात वन्यप्राण्यांनी मोठ्या प्रमाणात उपद्रव माजविला आहे. याबाबत शेतकऱ्यांची ओरड वाढलेली असूनही वनविभाग या समस्येकडे लक्ष पुरविण्यास मात्र तयार नाही. शिरोली येथील शेतकरी नंदकिशोर पायताडे यांच्या शेतातील संपूर्ण ज्वारीचे हाती आलेले पीक रानडुकरांनी उद्ध्वस्त करून टाकले आहे. उधार उसनवारी करून पेरलेली ज्वारी आता बहरली होती. काही दिवसांतच हे पीक शेतकऱ्याच्या हाती येणार होते. मात्र, ऐनवेळी रानडुकरांनी त्यांच्या शेतात शिरकाव केला. त्यांच्या शेतातील संपूर्ण ज्वारीचे पीक आडवे पडले आहे. आता कर्जफेडीची चिंता या शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यामुळे वनविभागाने शेतपिकाच्या नुकसानीची तातडीने दखल घेण्याची गरज आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. या परिसरात जंगल क्षेत्र असल्याने बिबट्यासह रोही, रानडुकर या वन्यप्राण्यांचा सदैव वावर असतो. वानरांमुळे या भागातील शेतपिके दरवर्षीच बाधीत होतात.
(तालुका प्रतिनिधी)