घाटंजी पालिकेचे उपाध्यक्ष व सदस्य कारकुनाच्या भूमिकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 09:54 PM2018-01-29T21:54:45+5:302018-01-29T21:55:18+5:30
कर्मचाऱ्यांची टंचाई असल्याने शहराचा विकास थांबला आहे. तरीही शासनाकडून पदभरतीकडे दुर्लक्ष सुरू आहे.
आॅनलाईन लोकमत
घाटंजी : कर्मचाऱ्यांची टंचाई असल्याने शहराचा विकास थांबला आहे. तरीही शासनाकडून पदभरतीकडे दुर्लक्ष सुरू आहे. कामे होत नसल्याने नागरिक आणि पदाधिकाऱ्यांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. लिपिकांची कामेही पदाधिकाऱ्यांना करावी लागत आहे. याच बाबीकडे लक्ष वेधण्यासाठी खुद्द उपाध्यक्ष शैलेश ठाकूर आणि काही नगरसेवकांनी प्रत्यक्ष कारकुनाची कामे केली. लिपिकांच्या खुर्चीत बसून त्यांनी या पदांची जबाबदारी सांभाळली.
नगरपरिषदेची निवडणूक होऊन वर्षभराचा कालावधी लोटला. मात्र लोकांच्या समस्या सोडविल्या जात नाही. दररोज तक्रारींचे प्रमाण वाढत आहे. पालिकेत अपुरे कर्मचारी आहे. कामे होत नसल्याने नागरिक पदाधिकाºयांकडे धाव घेत आहेत. मागील दहा वर्षांपासून नगरपरिषदेत पदभरती झालेली नाही. यासाठी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मात्र दखल घेण्यात आलेली नाही. नागरिकांना पालिकेच्या कामकाजाची माहिती, योजना, आवश्यक कागदपत्र अशा प्रकारची कामे पदाधिकाºयांना कार्यालयात बसून करावी लागत आहे. नगरपरिषदेचे उपाध्यक्ष शैलेश ठाकूर यांनी पालिकेत पदभरतीसाठी संचालकांकडे पत्रव्यवहार केला. काही दिवसांपूर्वी नगरपरिषद कार्यालयाला कुलूप लाऊन जिल्हाधिकाऱ्यांनाही याची माहिती दिली. तरीही पदभरतीविषयी काहीही हालचाली झालेल्या नाही. सोमवारी उपाध्यक्ष शैलेश ठाकूर, नगरसेवक सैयद फिरोज यांनी बाबूच्या खुर्चीत बसून लोकांच्या अनेक तक्रारींचा निपटारा करण्याचा प्रयत्न केला. अर्ज लिहून देण्यापर्यंतची कामेही त्यांनी केली. शहराच्या विकासाकरिता कर्मचाऱ्यांची आवश्यकता लक्षात घेता जनहित याचिका दाखल केली जाणार असल्याचे शैलेश ठाकूर यांनी सांगितले.