रोहयोच्या अपूर्ण विहिरी धडक सिंचनमध्ये पूर्ण करणार
By admin | Published: November 14, 2015 02:41 AM2015-11-14T02:41:59+5:302015-11-14T02:41:59+5:30
जिल्ह्यातील धडक सिंचन योजनेअंतर्गत रखडलेल्या सात हजार विहिरी रोजगार हमी योजनेतून पूर्ण करण्याचे निश्चित करण्यात आले.
२१० कोटींचा निधी : मुदतीत काम पूर्ण करण्याचे फर्मान
यवतमाळ : जिल्ह्यातील धडक सिंचन योजनेअंतर्गत रखडलेल्या सात हजार विहिरी रोजगार हमी योजनेतून पूर्ण करण्याचे निश्चित करण्यात आले. मात्र त्यानंतरही तांत्रिक अडचणींमुळे या विहिरी रखडल्या. आता पुन्हा राज्य मंत्रीमंडळात धडक सिंचन मधल्या मंजूर विहिरी व रद्द झालेल्या विहिरी पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.
रोजगार हमी योजनेतून विहिरी खोदण्यासाठी शेतकऱ्यांना तीन लाखांचे अनुदान दिले जाते. मात्र ही रक्कम खर्च करण्यासाठी अनेक अडचणी आहेत. रोहयोचे कार्डधारक मजूर कामावर लावावे लागतात. शिवाय अकुशल कामाचा मोबदलाही थेट काम करणाऱ्या व पुरवठादार एजन्सीच्या खात्यात जमा होतो. त्यामुुळे शेतकऱ्यांना पदरमोड करून विहिर खोदावी लागते. दुष्काळी स्थितीत ही बाब शक्य नाही. त्यामुळे यापूर्वी धडक सिंचन योजनेच्या वर्ग केलेल्या विहिरीसुद्धा रोहयोतून पूर्ण करता आल्या नाहीत. आता शासनाने सिंचन विहिरी पूर्ण करण्यासाठी जुन्याच धडक सिंचन विहिर योजनेचा आधार घेतला जात आहे. या योजनेतून मंजूर होऊन वर्ग केलेल्या आणि काही कारणास्तव रद्द झालेल्या विहिरी पूर्ण करण्यात येणार आहे.
विदर्भातील अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम, वर्धा व यवतमाळ या सहा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये धडक सिंचन विहिर योजना राबविण्याचे आतापर्यंत ३५ हजार ९८५ विहिरी पूर्ण झाल्या असून एक हजार ५३४ विहिरी अपूर्ण आहेत. तसेच या योजनेतील रद्द करण्यात आलेल्या विहिरींपैकी आठ हजार सातशे विहिरी धडक सिंचन योजनेअंतर्गत पुन्हा मंजूर केल्या जात आहेत.
अपूर्ण विहिरी पूर्ण करण्यासाठी शासनाने दोनशे दहा कोटींचा निधी उपलब्ध करून दिला असून ३० जून २०१६ पर्यंत विहिरी पूर्ण करावयाच्या आहेत. वरील सहा जिल्ह्यात धडक सिंचनमधील रोहयोत वर्ग केलेल्या एकूण १० हजार ३२० विहिरी आहेत.
या कालावधीत पूर्ण न होऊ शकणाऱ्या विहिरी ३० एप्रिलपासून धडक सिंचन विहिर योजनेमध्ये वर्ग करून पूर्ण करण्यास आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)