विषय समित्यांसाठी रस्सीखेच

By admin | Published: January 12, 2017 12:47 AM2017-01-12T00:47:50+5:302017-01-12T00:47:50+5:30

नगरपरिषदेच्या उपाध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांची निवड झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष विषय समिती व सभापतींच्या निवडीकडे लागले आहे.

Rope for the subject committees | विषय समित्यांसाठी रस्सीखेच

विषय समित्यांसाठी रस्सीखेच

Next

पुसद नगरपरिषद : बांधकाम व पाणीपुरवठ्यासाठी कसरत
पुसद : नगरपरिषदेच्या उपाध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांची निवड झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष विषय समिती व सभापतींच्या निवडीकडे लागले आहे. गुरूवारी नगरपरिषदेच्या सभागृहात सकाळी ११ वाजता नगरसेवकांच्या विशेष सभेत सभापतींची निवड केली जाणार आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले तर सहाय्यक म्हणून मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाळे राहतील.
पुसद नगरपरिषदेत काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी झाली असून, राष्ट्रवादी १२, काँग्रेस तीन, भाजपा १० व शिवसेना चार असे एकूण २९ नगरसेवक व नगराध्यक्ष अनिताताई नाईक असे एकूण ३० सभासद आहेत. गुरूवारी सर्व नगरसेवकांच्या विशेष सभेत पहिल्या सत्रात विषय समितीसाठी किमान आठ किंवा कमाल नऊ अशी सदस्य संख्या निश्चित करून गटनेत्यांकडून नावे सुचविण्यात येणार आहेत. पुसद नगरपरिषदेत बांधकाम, पाणीपुरवठा, आरोग्य, नियोजन, महिला व बाल कल्याण, शिक्षण अशा सहा समित्यांसाठी सभापतींची निवड होईल. बांधकाम व पाणीपुरवठा सारखे महत्वाचे सभापतीपद मिळावे यासाठी आघाडीमध्ये प्रचंड रस्सीखेच सुरू आहे.
समिती सदस्यांची संख्या आठ ते नऊच्या दरम्यान राहणार आहे. आघाडी १५ तर युतीचे १४ नगरसेवक आहेत. स्थायी समितीवर जाण्यासाठीही काही जणांचे प्रयत्न सुरू आहे. राष्ट्रवादीचे नेते आमदार मनोहरराव नाईक, नगरपरिषदेचे उपाध्यक्ष डॉ. अकिल मेमन व काँग्रेसचे डॉ. मोहंमद नदीम, जकी अन्वर आदींची सभापती निवडीच्या पूर्वसंध्येला विशेष बैठक झाली. यामध्ये बरेच काही सिजल्याची चर्चा आहे. यामध्ये नेमक्या किती समित्या काँग्रेसच्या पदरात पडतात याकडे आता शहरवासियांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)

नागरिकांना आता विकासाची अपेक्षा
पुसद शहरात नगर परिषद निवडणूक पार पडली. यामध्ये जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडून द्यायचा होता, जनतेने अनिताताई नाईक यांच्यावर विश्वास टाकला आणि त्यांना निवडून दिले. आता विषय समित्यांच्या निवडीमध्ये जनतेची एवढीच इच्छा आहे की, शहराचा प्रामाणिकपणे विकास करणाऱ्यांची निवड व्हावी. पाणीपुरवठा, आरोग्य, बालकल्याण आदी महत्वपूर्ण विभागात सध्या पुसद शहर चांगलेच माघारले आहे. या सर्व विषयांमध्ये वेगवान काम होणे काळाची गरज आहे. तेंव्हा अशाच तडफदार नगरसेवकांना सभापतीपद मिळावे, अशी पुसदकर जनतेची या निवडीमध्ये माफक अपेक्षा आहे.
 

Web Title: Rope for the subject committees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.