पाच एकरातील उभ्या संत्रावर फिरविली आरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2021 05:00 AM2021-10-30T05:00:00+5:302021-10-30T05:00:02+5:30
शेतकरी रघुनाथ मेश्राम यांनी उमरी येथे आपल्या पाच एकरात संत्रा बगीचा लावला होता. संत्रा आणि भाजीपाला विकून ते कुुटुंब चालवितात. संपूर्ण तालुक्यात संत्रा ते प्रसिद्ध आहे. मात्र यंदा पावसामुळे संत्र्याचे नुकसान झाले. झाडावरील काही फळे चोरट्यांनी लंपास केली. रघुनाथ मेश्राम यांचे वय ६५ झाले आहे. त्यामुळे आता आपण कुणाशी भांडूही शकत नाही, असे त्यांनी सांगितले.
हरिओम बघेल
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : अस्मानी व सुलतानी संकटामुळे सर्वच शेतकरी हवालदिल झाले आहे. शासकीय धोरणामुळे अनेक शेतकरी संताप व्यक्त करीत आहे. याच संतापातून तालुक्यातील उमरी येथील एका वृद्ध शेतकऱ्याने तब्बल पाच एकरावर उभ्या असलेल्या संत्रा झाडांवर आरी चालविली.
शेतकरी रघुनाथ मेश्राम यांनी उमरी येथे आपल्या पाच एकरात संत्रा बगीचा लावला होता. संत्रा आणि भाजीपाला विकून ते कुुटुंब चालवितात. संपूर्ण तालुक्यात संत्रा ते प्रसिद्ध आहे. मात्र यंदा पावसामुळे संत्र्याचे नुकसान झाले. झाडावरील काही फळे चोरट्यांनी लंपास केली.
रघुनाथ मेश्राम यांचे वय ६५ झाले आहे. त्यामुळे आता आपण कुणाशी भांडूही शकत नाही, असे त्यांनी सांगितले.
पावसामुळे संत्र्याचे नुकसान झाल्याने हताशपणे त्यांनी आता फळांनी लदबलेली पाच एकरातील संपूर्ण बागच काढून टाकण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पाच एकरातील संत्रा झाडांवर आरा चालविला. पावसामुळे नुकसान होऊनही शासकीय कर्मचारी संवेदनशीलपणे वागत नसल्याचा आरोप त्यांनी केला. शासनदरबारी कुणीच दखल घेत नाही. त्यामुळे आपण हा टोकाचा निर्णय घेतल्याचे मेश्राम यांनी सांगितले.
आरा चालविताना डोळ्यांत अश्रू
मुलाप्रमाणे जपलेली संत्राबाग स्वत:च काढून टाकताना रघुनाथ मेश्राम यांच्या डोळ्यांत अश्रू तरळत होते. शासन आणि कृषी विभागाने कोणतीही मदत न केल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. या झाडांचे आता संरक्षण करू शकत नसल्याने पोटच्या मुलाप्रमाणे जपलेल्या संत्राबागेवर आरा चालवीत असल्याचे त्यांनी सांगितले.