बारदाना आला, पण जागाच नाही
By Admin | Published: March 17, 2017 02:44 AM2017-03-17T02:44:20+5:302017-03-17T02:44:20+5:30
बारदान्याअभावी रखडलेली तुरीची खरेदी आता जागेच्या अभावाने संकटात सापडली. जागेच्या समस्येवर
सरकारी भूमिका शंकास्पद : यवतमाळ, बाभूळगावला गोदामच नाही
यवतमाळ : बारदान्याअभावी रखडलेली तुरीची खरेदी आता जागेच्या अभावाने संकटात सापडली. जागेच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मुंबई कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्याच्या मंजुरीनंतरच तूर खरेदीची समस्या सुटणार आहे. त्यामुळे खरेच सरकार तूर खरेदी करणार का, असा प्रश्न तूर उत्पादकांना सतावत आहे.
जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून तूर खरेदीने उग्ररूप धारण केले आहे. बाजार समितीच्या सभापतींनी प्रथम बारदाना आंदोलन केले. खरेदी सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला. यानंतरही शासकीय यंत्रणा ही समस्या गांभीर्याने सोडविण्यास तयार नाही. बारदाना घेऊन निघालेला एक ट्रक जिल्ह्यात दाखल झाला अन् पुन्हा नव्या संकटाला सुरूवात झाली. बारदाना येताच सीडब्लूसीने जागा नसल्याचे कारण सांगत तूर ठेवण्यास नकार दिला. परिणामी बारदाना मिळूनही तूर खरेदी थांबली आहे.
यावर तोडगा काढण्यासाठी विदर्भ को-आॅपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशनने जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव मुंबई कार्यालयाकडे पाठविला. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर दारव्हा रोडवरील शासकीय गोदामात तूर साठवली जाणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेला आणखी किमान दोन दिवसांचा अवधी लागणार आहे. यामुळे शेतकरी वैतागले आहेत. शासकीय खरेदीवर विसंबून असणाऱ्या शेतकऱ्यांनी आता धीर सोडला आहे. दरम्यान, अवकाळी पावसाने तुरीचे नुकसान होत आहे. (शहर वार्ताहर)
राळेगाव केंद्र बंद, आर्णीत बारदानाही नाही
यवतमाळ व बाभूळगाव केंद्रावर तूर खरेदीचा प्रश्न गंभीर बनला आहे. या दोन्ही ठिकाणी बारदाना उपलब्ध आहे. मात्र आता जागा नाही. आर्णी केंद्रावर जागा आहे, मात्र बारदाना नाही. राळेगावचे केंद्र एफसीआयने बंद केले आहे.
व्हीसीएमएसची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव
तथापि खरेदी झालेली तूर ठेवण्यासाठी यवतमाळ केंद्राकडे जागाच नाही. यामुळे यवतमाळचे व्हीसीएमएसचे केंद्र अडचणीत सापडले आहे. या ठिकाणी बारदाना असला तरी जागाच नसल्याने तूर ठेवायची कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विदर्भ मार्केटिंग फेडरेशनचे अधिकारी अडचणीत सापडले आहे. त्यांनी या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे.