नियोजित ठिकाणाऐवजी भलतीकडेच बनवला रस्ता
By admin | Published: January 6, 2016 03:21 AM2016-01-06T03:21:34+5:302016-01-06T03:21:34+5:30
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाची विविध कामे वादग्रस्त ठरत आहे. या संदर्भात वेळोवेळी ओरड होवूनही
आर्णी : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाची विविध कामे वादग्रस्त ठरत आहे. या संदर्भात वेळोवेळी ओरड होवूनही कामकाजाच्या पद्धतीत मात्र बांधकाम विभागाने सुधारणा केलेली नाही. आर्णी तालुक्यात तर पूर्वनियोजित ठिकाण सोडून भलतीकडेच रस्त्याचे बांधकाम करण्यात आल्याचा अजब प्रकार उघडकीस आला आहे.
रुद्रापूर ते चिकणी हा पांदण रस्ता जिल्हा परिषद बांधकाम विभागाने केला आहे. परंतु हा रस्ता नियोजित नकाशानुसार झालेला नाही. यात चिकणी शिवारात शेत असलेले अल्पभूधारक आदिवासी शेतकरी बळीराम जयराम सोयाम (६५) यांच्या शेताच्या मधातून हा रस्ता करण्यात आला आहे. त्यामुळे आधीच अल्पभूधारक असलेल्या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. या बाबत शेतकऱ्याने जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि आर्णीच्या तहसीलदारांकडे तक्रार दाखल केली आहे.
या कामावरील संबंधित अभियंत्याने रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केले आहे. पाहिजे तेथे पाणी जाण्यासाठी सिमेंटचे पाईपही टाकलेले नाही. याची वरिष्ठांनी लगेच दखल घेवून संबंधित अभियंत्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. नियोजित ठिकाणावरून हा रस्ता करावा व शेतकऱ्याचे झालेले नुकसान भरून द्यावे, अशी मागणीही तक्रारीत शेतकऱ्याने केली आहे. बांधकाम विभागाने रस्त्याच्या बांधकामासाठी आधीच ठरविलेल्या जागेवर रस्ता होईल, अशी परिसरवासीयांना मोठी आस होती. बांधकाम विभागाने तत्परता दाखवून रस्ता बांधलादेखील. पण हा रस्ता पूर्वनियोजित जागेवर बांधण्याऐवजी एका अल्पभूधारक शेतकऱ्याच्या उभ्या पिकात घुसवण्यात आला. यामुळे संबंधित शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झालेच, परंतु जेथे रस्त्याची खरी गरज होती त्या परिसरातील नागरिकही रस्त्यापासून वंचित राहिले आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या या उफराट्या कारभाराबद्दल परिसरात चांगलाच संताप निर्माण झाला आहे. कुणाची सरबराई करण्यासाठी किंवा कुणाचे उखळ पांढरे करण्यासाठी रस्त्याच्या नियोजित ठिकाणामध्ये बदल करण्यात आला, असा प्रश्न सर्वसामान्य गावकऱ्यांना पडलेला आहे.
आता या संदर्भात वरिष्ठ अधिकारी कोणती पावले उचलतात, याकडे शेतकऱ्याचे लक्ष लागले आहे. एकीकडे शेतकरी वाचवण्यासाठी शासनाचे अभियान सुरू आहे, तर दुसरीकडे काही अधिकारी बेजबाबदारपणे वागत असल्याचे या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे.
(शहर प्रतिनिधी)