दोन एटीएम फोडून पळविले 21 लाख रूपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2022 05:00 AM2022-03-11T05:00:00+5:302022-03-11T05:00:11+5:30
हिवरासंगम येथील मुख्य बाजारपेठेत हिताशी कंपनीचे एटीएम आहे. बसस्थानकापासून २०० मीटर अंतरावर असलेल्या एटीएमचे शटर वाकवून चोरट्यांनी उघडले. नंतर गॅस कटरने मशीनचे लॉकर कापले. यापूर्वी चोरट्यांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारला व एक लाख रुपयांची रोख रक्कम लंपास केली. ही घटना बुधवारी मध्यरात्रीनंतर १.५० ते २ वाजण्याच्या दरम्यान घडली. अवघ्या दहा मिनिटांत चोरट्यांनी एटीएम मशीन रोख काढली.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी/हिवरासंगम : अनेक सुरक्षा साधने लावलेले एटीएम मशीन चोरट्यांकडून सराईतपणे फोडले जात आहे. गुरुवारी पहाटेच्या सुमारास तासाभराच्या अंतरात दोन एटीएम फोडून चोरट्यांनी २१ लाख रोख रक्कम पळविली. गेल्या काही दिवसांपासून महागाव परिसरासह नागपूर, बोरी, तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गावर असलेले एटीएम चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. हिवरासंगम व आर्णी येथील घटनेमुळे मोठी खळबळ निर्माण झाली आहे.
हिवरासंगम येथील मुख्य बाजारपेठेत हिताशी कंपनीचे एटीएम आहे. बसस्थानकापासून २०० मीटर अंतरावर असलेल्या एटीएमचे शटर वाकवून चोरट्यांनी उघडले. नंतर गॅस कटरने मशीनचे लॉकर कापले. यापूर्वी चोरट्यांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारला व एक लाख रुपयांची रोख रक्कम लंपास केली. ही घटना बुधवारी मध्यरात्रीनंतर १.५० ते २ वाजण्याच्या दरम्यान घडली. अवघ्या दहा मिनिटांत चोरट्यांनी एटीएम मशीन रोख काढली. जाताना एटीएमचे शटर बंद केले. त्यामुळे ही घटना सकाळी नऊ९ वाजेपर्यंत उघडकीस आली नाही. हिवरा संगम बसस्थानक परिसरात पुसद, माहूर रोडवर पांढऱ्या रंगाची कार जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आढळली आहे. पोलीस तिचा शोध घेत आहे. हिवरासंगमची घटना घडल्यानंतर अवघ्या ४५ मिनिटांतच २७ किलोमीटर अंतरावर असलेल्या आर्णी येथील बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्यात आले. येथेही चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर काळ्या रंगाचा स्प्रे फवारला. त्यामुळे घटनाक्रम कॅमेऱ्यात आला नाही. चोरट्यांनी गॅसकटरचा वापर करीत एटीएमचे लॉकर तोडले. या दोन्ही एटीएमवर सुरक्षा रक्षक तैनात नव्हता व आलाराम सुविधाही उपलब्ध नव्हती. त्यामुळे गॅस कटरने एटीएमचे लॉकर तोडत असतानाही कुठलाही आवाज आला नाही. आर्णीतील एटीएममधून २० लाख ४३ हजारांची रोख चोरट्यांनी काढून घेतली. २.४५ वाजता पैसे घेऊन ते पसार झाले. हा प्रकार गुरुवारी सकाळी लक्षात आला. त्यानंतर याची माहिती मनोज वसंत जाधव यांनी आर्णी पोलिसांना दिली. तहसील चौकातील मुख्य मार्गावरचे एटीएम फोडल्याने येथील व्यापारी वर्गाला मोठा धक्का बसला आहे. हा रस्ता वर्दळीचा असतानाही चोरीचा प्रकार कोणाच्याच निदर्शनास आला नाही. या दोन्ही घटनास्थळाला पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख प्रदीप शिरस्कर, सायबर सेल टीम, श्वानपथक, ठसे तज्ज्ञांची चमू यांनी भेट दिली. आर्णी येथे श्वानाला कुठलाच सुगावा मिळाला नाही. हिवरासंगम येथे मात्र श्वानाने बसस्थानकापर्यंत चोरट्यांचा माग दाखविला. नंतर ते घुटमळले. चोरटे वाहनाने पसार झाल्याने श्वानाला पुढील माग दिसला नाही. आर्णी व महागाव पोलीस ठाण्यांत अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.
परप्रांतीय टोळीसह मराठवाड्यावर लक्ष
- एटीएम फोडणाऱ्या टोळ्यांच्या गुन्ह्याची पद्धत पाहून पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली आहे. पंजाब, राजस्थान, हरियाणा या राज्यांतील टोळ्यावर लक्ष केंद्रित केले आहे, तर मराठवाड्यातील परभणीमध्ये नव्यानेच तयार झालेल्या अशा टोळ्यांच्या कारवायांचा अभ्यास करून शोध घेतला जात आहे. त्यामुळे लवकरच टोळीचा छडा लागण्याची शक्यता आहे.
टोल नाक्यावरचे सीसीटीव्ही आधार
- यापूर्वी पोलिसांनी टोल नाक्यावरील सीसीटीव्हीचा आधार घेऊन परप्रांतीय टोळीला जेरबंद केले होते. आताही नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात आहे. दोन्ही घटनाक्रमानंतर चोरटे नागपूरकडे पसार झाले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे.
- सतत एटीएम फोडण्याच्या घटना घडत असल्याने सर्वसामान्य माणसांचा पैसा असुरक्षित झाला आहे. बॅंकांनाही फटका बसत आहे.