शिक्षकाकडून एक लाखांची खंडणी घेताना आरटीआय कार्यकर्ता अडकला, दीड लाख मागून मानसिक त्रास
By विलास गावंडे | Published: January 24, 2024 06:11 PM2024-01-24T18:11:10+5:302024-01-24T18:12:22+5:30
ही रक्कम स्वीकारताना त्याला रंगेहात पकडण्यात आले.
आर्णी (यवतमाळ) : माहितीच्या अधिकारात वैयक्तिक माहिती मागून शिक्षकाला खंडणी मागणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्त्याविरुध्द आर्णी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीड लाख रुपयांची मागणी या शिक्षकाला करण्यात आली होती. ही रक्कम स्वीकारताना त्याला रंगेहात पकडण्यात आले.
चिकणी (ता.आर्णी) येथील गणपतराव पाटील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेचे प्राथमिक शिक्षक साहेबराव मोहाड यांच्याविषयी आयता (ता.आर्णी) येथील अभिजीत मधुकर मडावी याने वैयक्तिक स्वरूपाची माहिती प्रकल्प अधिकारी आणि अपर आयुक्तांकडे मागितली. होती. माहितीचा अर्ज मागे घेण्यासाठी त्याने शिक्षक मोहाड यांना दीड लाख रुपयांची मागणी केली. शिक्षकाने ही मागणी मान्य करून पहिला हप्ता एक लाख रुपये देण्याचे कबूल केले.
या सर्व घडामोडीनंतर त्यांनी आर्णी येथील ठाणेदार केशव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांना आपबिती सांगितली. दरम्यानच्या काळात अभिजीत मडावी याने शिक्षकाला विविध ठिकाणी बोलाविले. ठाणेदारांनी खातरजमा करून २३ जानेवारी रोजी सापळा रचला. आर्णी येथील बाबा कम्बलपोष दर्गाजवळ भाजी मार्केटरोडवर शिक्षकाजवळून एक लाख रुपये स्वीकारताना मडावी याला रंगेहात पकडण्यात आले. त्याच्याविरुध्द कलम ३८४. ३८५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास ठाणेदार केशव ठाकरे करीत आहे.