परिवहन आयुक्तांकडून आरटीओची झाडाझडती
By admin | Published: March 27, 2016 02:19 AM2016-03-27T02:19:10+5:302016-03-27T02:19:10+5:30
येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची निष्क्रीयता खुद्द परिवहन मंत्र्यांनी अनुभवल्यानंतर शुक्रवारी परिवहन आयुक्तांनी जिल्ह्याचा दौरा केला.
महसूल घटला : पिंपळखुटी चेक पोस्टचीही तपासणी
यवतमाळ : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची निष्क्रीयता खुद्द परिवहन मंत्र्यांनी अनुभवल्यानंतर शुक्रवारी परिवहन आयुक्तांनी जिल्ह्याचा दौरा केला. कार्यालयात तब्बल चार तास ठिय्या देऊन प्रत्येक विभागाची पाहणी करीत झाडाझडती घेतली. एकंदर कामकाज आणि घटलेले महसुली उत्पन्न याबाबत स्थानिक अधिकाऱ्यांना जाब विचारला. इतकेच नव्हे तर पिंपळखुटी चेक पोस्टलाही भेट देऊन तेथील कामकाजाची तपासणी केली.
परिवहनमंत्री दिवाकरराव रावते गत आठवड्यात जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी अवैध प्रवासी वाहतुकीचे वास्तव स्वत: अनुभवले होते. त्यानंतर उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर परिवहन आयुक्त श्याम वर्धने यांनी शुक्रवारी येथील आरटीओ कार्यालयाला भेट दिली. आयुक्तांनी स्वत: कार्यालयाच्या सर्व विभागांची पाहणी केली. येथे अनेक ठिकाणी कागदांचे गठ्ठे अस्ताव्यस्त पडलेले आढळून आले. कर्मचाऱ्यांच्या टेबला जवळ पानाच्या पिचकाऱ्या दिसत होत्या. यावरून अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी करण्यात आली. कार्यालयाचे महसुली उत्पन्नाचे उद्दीष्ट घटले आहे. याबाबत उपविभागीय परिवहन अधिकाऱ्यासह उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, उपप्रादेशिक सहायक परिवहन अधिकारी यांना जाब विचारण्यात आला. वाहनांची नियमित तपासणी केली जात नसल्याचा ठपका खुद्द आयुक्तांनी ठेवला. यामुळेच उत्पन्न घटल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला.
कार्यालयात नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, आयुक्त येणार असल्याने येथील खासगी कर्मचारी मात्र बेपत्ता होते. अधिकारी-कर्मचाऱ्यांचा क्लास घेतल्यानंतर आयुक्तांनी आपला मोर्चा पिंपळखुटी चेक पोस्टकडे वळविला. येथील सीसीटीव्ही कॅमेराच्या रेंज बाहेर असलेली चौकी आयुक्तांच्या दौऱ्यावर नियोजित स्थळी आणली होती. येथे काम करणारे १०८ खासगी कर्मचारीही पद्धतशीरपणे गैरहजर होते. यावेळी वाहन तपासणीचे रेकॉर्ड आयुक्तांनी पाहिले. मात्र येथे वाहनधारकांना दिल्या जाणाऱ्या बोगस पावत्या पद्धतशीरपणे दडवून ठेवण्यात आल्या. चेक पोस्टवर संगणकीकृत पावती देणे अपेक्षित आहे. मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. ही बाब आयुक्तांच्या निदर्शनास येऊच नये अशी व्यवस्था करून पांघरून घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. (कार्यालय प्रतिनिधी)
सीसीटीव्हीपुढे अडथळा
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात चालणारा भोंगळ कारभार सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये येऊ नये यासाठी येथील लिपिकवर्गीय यंत्रणेने पद्धतशीरपणे कॅमेराच्या समोरच कपाट लावून अडथळा निर्माण केला आहे. त्यांच्या बसण्याची जागा सोडून इतर सर्व भागाचे चित्रीकरण होईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.