सत्ताधारी, विरोधी सदस्यांनी घेतला विभागप्रमुखांचा क्लास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2021 05:00 AM2021-10-13T05:00:00+5:302021-10-13T05:00:25+5:30
जिल्हा परिषदेतील अनुपालन अहवालाबाबत सदस्यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतरही कामाची पद्धत सुधारलेली नाही. ही बाब सदस्यांनी निदर्शनास आणून देत अधिकाऱ्यांनी कशा पद्धतीने काम करावे यासाठी त्यांच्याकरिता कार्यशाळा घ्या, अशी उपरोधिक मागणी केली. प्रशासन प्रमुखाचे नियंत्रण नसल्याने अंतर्गत कुरघोडी सुरू झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील जिल्हा परिषद प्रशासनावर अंकुश राहिलेला नाही. त्यामुळे विभागप्रमुखासह अधिनस्त यंत्रणा मनमर्जीने कारभार चालवत आहे. हीच बाब मंगळवारी दुपारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत सत्ताधारी व विरोधी सदस्यांनी मांडली. ठराव घेतल्यानंतरही त्याच्या अनुपालनाचा अहवाल का सादर केला जात नाही, असा प्रश्न उपस्थित करून सदस्यांनी विभागप्रमुखांचा क्लास घेतला.
जिल्हा परिषदेतील अनुपालन अहवालाबाबत सदस्यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतरही कामाची पद्धत सुधारलेली नाही. ही बाब सदस्यांनी निदर्शनास आणून देत अधिकाऱ्यांनी कशा पद्धतीने काम करावे यासाठी त्यांच्याकरिता कार्यशाळा घ्या, अशी उपरोधिक मागणी केली. प्रशासन प्रमुखाचे नियंत्रण नसल्याने अंतर्गत कुरघोडी सुरू झाली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आता कठोर भूमिका घेण्याची गरज आहे, अन्यथा अशा सभा कितीही झाल्या तरी त्याला अर्थ उरणार नाही, अशाही शब्दात सदस्यांनी आपला संताप व्यक्त केला. या वादळी सभेनंतर कारभार किती सुधारतो याकडे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षा कालिंदा पवार, उपाध्यक्ष बाळासाहेब कामारकर, सभापती राम देवसरकर, श्रीधर मोहोड, विजय राठोड, जया पोटे, सीईओ डाॅ. श्रीकृष्ण पांचाळ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद गुडधे आदी उपस्थित होते.
अध्यक्षांनाही बसला बिरोक्रसीचा फटका
- जिल्हा परिषदेतील प्रशासन ढासळल्याचा फटका अध्यक्षा कालिंदा पवार यांना बसला. अध्यक्षांचे वाहन काही दिवसांपासून नादुरुस्त आहे. ते तातडीने दुरुस्त व्हावे, असे निर्देशही दिले. मात्र, त्यानंतरही यावर संबंधितांनी कार्यवाही केली नाही. परिणामी मंगळवारच्या स्थायी समिती सदस्यांना अध्यक्षांना दुचाकीवरून जिल्हा परिषदेत यावे लागले. सभेत जिल्हा परिषद अध्यक्षांनीसुद्धा एकूणच कारभारावर तीव्र शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली.