बाबासाहेबांच्या जयंतीपासून प्रत्येक शाळेपर्यंत जाणार पुस्तकांचा अमृतकुंभ
By अविनाश साबापुरे | Published: April 11, 2023 05:54 PM2023-04-11T17:54:02+5:302023-04-11T17:59:05+5:30
गुणवत्तावाढीसाठी जिल्हाधिकाऱ्यांची संकल्पना : दोन हजार शाळांसाठी फिरते वाचनालय
यवतमाळ : केवळ दप्तरातली पुस्तकं वाचूनच ज्ञान मिळते असे नाही, तर त्यासाठी शाळेच्या पलिकडची अवांतर पुस्तकेही वाचणे आवश्यक असते. हाच धागा हेरून आता जिल्ह्यातील दोन हजारांहून अधिक शाळांसाठी ‘पुस्तकांचा अमृत कुंभ’ हा उपक्रम राबविला जाणार आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून पुढे आलेल्या या वाचन उपक्रमाचा आरंभ भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनापासून केला जाणार आहे.
देशातील १० शैक्षणिक मागास जिल्ह्यांच्या (एलपीडी) यादीतून यवतमाळला बाहेर काढण्यासाठी गेल्या वर्षभरापासून शिक्षण विभाग जंग जंग पछाडत आहे. त्यांच्या प्रयत्नाला नव्या संकल्पनेची जोड देण्यासाठी आता जिल्हा प्रशासनही सरसावले आहे. ‘अमृत कुंभ’ हा उपक्रम म्हणजे फिरते वाचनालय आहे. हे वाचनालय एकेक शाळा करीत ठराविक कालावधीत जिल्ह्यातील दोन हजारांपेक्षा अधिक शाळांपर्यंत जाणार आहे.
प्रत्येक शाळेला त्यातील पुस्तके वाचण्यासाठी ठराविक कालावधी दिला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्हा प्रशासनामार्फत या वाचनालयाकरिता पुस्तके पुरविली जाणार आहे. मात्र या वाचनालयातील पुस्तकांचे प्रमाण आणखी वाढविण्यासाठी शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था, संघटना, अधिकारी, कर्मचारी, मान्यवर व्यक्तींकडून दान स्वरुपात पुस्तके स्वीकारली जाणार आहेत. त्यासाठी नागरिकांनी मुक्तहस्ते या वाचनालयाकरिता शिक्षण विभागाला पुस्तके भेट द्यावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार २०२६-२७ पर्यंत शंभर टक्के विद्यार्थ्यांमध्ये भाषिक आणि गणितीय कौशल्य निर्माण करण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे. त्या अनुषंगाने ‘निपुण भारत’ हे अभियानही राबविले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा प्रशासनाने फिरत्या वाचनालयाची संकल्पना पुढे आणली आहे.
१६ तालुक्यांना ३२ संच देणार
अमृत कुंभ म्हणजे २२१ पुस्तकांचा एक संच राहणार आहे. उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात जिल्हा प्रशासनाकडून ३२ संच दिले जाणार आहेत. प्रत्येक तालुक्यातील दोन अशा एकंदर ३२ केंद्रांना या संचांचे वाटप केले जाणार आहे. एका केंद्रातील सर्व शाळांमध्ये ही पुस्तके आळीपाळीने पोहोचतील. त्यानंतर हा अमृतकुंभ संच दुसऱ्या केंद्राकडे हस्तांतरित केला जाणार आहे. शाळा-शाळांमध्ये आणि वर्गा-वर्गांमध्ये पुस्तकांची देवाणघेवाण सुलभ व्हावी यासाठी पुस्तकांचा अमृत कुंभ तीन मोठ्या कापडी पिशव्यांच्या माध्यमातून पुरविला जाणार आहे.
उद्या जिल्हा परिषदेत वितरण
अमृत कुंभ उपक्रमातील पुस्तकांचे वितरण गुरुवारी १३ एप्रिल रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि सीईओ डाॅ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते केले जाणार आहे. सकाळी १० वाजता होणाऱ्या या वितरण समारंभाला शिक्षणाधिकारी किशोर पागोरे, उपशिक्षणाधिकारी राजू मडावी तथा सर्व विभाग प्रमुख उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर बाबासाहेबांच्या जयंतीदिनापासून या पुस्तकांचे शाळांमध्ये वाचन सुरू होणार आहे. ३० एप्रिलपर्यंत पहिल्या टप्प्यातील केंद्रांमध्ये वाचन आटोपल्यानंतर उन्हाळी सुटीच्या कालावधीतही वेगळ्या प्रकारचे नियोजन करण्यात आले आहे.