ग्रामीण जनता खासगी फायनान्सच्या विळख्यात
By admin | Published: November 18, 2015 02:47 AM2015-11-18T02:47:30+5:302015-11-18T02:47:30+5:30
वैयक्तिक कर्ज बचत गट, शेती, घरे यासह इतर स्थावर मालमत्ता गहाण ठेवून कर्जपुरवठा करणाऱ्या खासगी फायनान्स कंपनीच्या एजंटनी ....
दारव्हा तालुका : शेतीनंतर आता घरेही गहाणात
मुकेश इंगोले दारव्हा
वैयक्तिक कर्ज बचत गट, शेती, घरे यासह इतर स्थावर मालमत्ता गहाण ठेवून कर्जपुरवठा करणाऱ्या खासगी फायनान्स कंपनीच्या एजंटनी तालुक्यात अक्षरश: उच्छाद मांडला आहे. पैशाची गरज असणारी भोळीभाबडी जनता त्यांच्या जाळ्यात अलगद अडकत असून ग्रामीण भागातील लोक या कंपनीच्या विळख्यात सापडली आहे.
विविध प्रकारच्या बँका व खासगी सावकारांकडे आधीच अनेकांची शेती गहाण आहे. त्यातच आता घरे व इतर स्थावर मालमत्ता गहाण ठेवून घेण्याचा सपाटा खासगी कंपन्यांनी सुरू केला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेकजण या कंपन्यांच्या नादी लागून कंगाल होण्याच्या मार्गावर आहे. दारव्हा तालुक्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. गेल्या काही वर्षापासून नैसर्गिक संकटांमुळे सतत नापिकी सुरू आहे. लागवड खर्चही निघणाऱ्या पिकातून भरून निघण्याची शक्यता नाही. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा, या विवंचनेत शेतकरी बांधव आहेत. काही जोडधंदा करावा म्हटले तर शेती आधीच गहाणात आहे. बँका कर्ज देत नाही. कारण कर्जाचा भरणा न करता आल्यामुळे थकीतचा शिक्का अनेकांवर लागलेला आहे.
घरात पैसा नाही. शेती पिकत नाही. त्यामुळे बिकट परिस्थिती केवळ शेतकऱ्यांवरच नव्हेतर शेतमजूर व शेतीवर अवलंबून असणाऱ्या सर्वच घटकांवर ओढवली आहे. या बिकट परिस्थितीवर मात करण्यासाठी इतर कुठल्या मार्गांनी पैसा उभारला जाऊ शकतो का? अशा विचारात हे सर्व घटक आहेत. नेमका याचाच फायदा खासगी फायनान्स कंपन्या घेत आहे.
अशा अनेक कंपन्यांनी दारव्हा तालुक्यावर लक्ष केंद्रित केले आहे. या कंपन्यांच्या एजंटचा दिवसभर शहरात डेरा असतो. हे एजंट काही स्थानिक लोकांना हाताशी धरून त्यांच्या कर्जपुरवठ्याच्या स्किम ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहोचवितात. त्यानंतर अगदी सहजतेने मिळणाऱ्या कर्जामुळे अनेकजण आकर्षित होतात. इतर राष्ट्रीयकृत बँकांप्रमाणे येथे भरभक्कम कागदपत्रे गोळा करावी लागत नाही. बँक कार्यालयाच्या भोवती चकरा माराव्या लागत नाही. तसेच अधिकाऱ्यांनाही वारंवार विनवन्या कराव्या लागत नाही. उलट या कंपन्यांचे एजंटच ग्राहकांच्या घरापर्यंत येतात व फार औपचारिकता पूर्ण न करता अल्पावधीत कर्ज उपलब्ध करून देतात. वैयक्तिक कर्जासह बचत गट स्थापन करून त्या माध्यमातूनही कर्ज देणाऱ्या काही परप्रांतातील कंपन्यांचे कार्यालयसुद्धा शहरात थाटण्यात आले आहे. या कंपनीद्वारे तालुक्यातील अनेक बचत गटांना कर्ज दिले गेल्याची माहिती मिळाली आहे. या कर्जपुरवठ्यामध्ये कमी कागदपत्रे, अल्प कालावधी व सहजतेने कर्ज मिळत असले तरी नेमक्या कोणत्या कागदपत्रावर स्वाक्षरी घेतल्या जातात, कर्जाची परतफेड, व्याजाचे दर व सर्वात महत्त्वाचे म्हणजे या कंपन्या अधिकृत आहे की नाही, याची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे. परंतु या बाबत पूर्ण माहिती नसणे व पैशाची गरज यामुळे अनेकजण या खासगी फायनान्स कंपन्यांकडे वळत आहे. हळूहळू या कंपन्यांचे जाळे संपूर्ण तालुक्यात पसरत असून एजंटमार्फत गरजवंतांना नादी लावून त्यांची शेती, घरे व इतर स्थावर मालमत्ता गहाणात ठेवून घेण्याचा धंदा जोरात सुरू आहे. या संदर्भात वेळीच मार्गदर्शन झाले नाही तर अनेकजणांवर बेघर होण्याची पाळी येण्याची शक्यता आहे.