राळेगावातील ग्रामीण रस्ते बिघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 05:00 AM2020-10-12T05:00:00+5:302020-10-12T05:00:31+5:30
खैरी ते करणवाडी हा मार्ग गड्ड्यांचा मार्ग म्हणून ओळखला जावू लागला आहे. खैरी फाटा ते आष्टोना, मंगी, दहेगाव मार्ग ग्रामस्थांची परीक्षा घेणारा ठरत आहे. येवती-चहांद-खडकी रस्ता बांधून फार वर्षे झालेली नाहीत. तरी स्थिती वाईट झाली आहे. किन्ही फाटा ते चाचोरा रस्ता झाडगाव-झरगड रस्त्यांना आता नवनिर्माणाची प्रतीक्षा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
राळेगाव : तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांची अनेक ठिकाणी वाट लागली आहे. चिखल आणि खड्ड्यातून जवळपासच्या गावात ये-जा करण्यात ग्रामस्थांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. बिघडलेले रस्ते कधी दुरुस्त होतील, याबाबत ग्रामस्थ लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांना वारंवार विचारणा करीत आहे.
काही ठिकाणी रस्त्यांची कामे मंजूर झाली. त्यातील काही कामे सुरू झाली. अनेक अद्यापही अपूर्ण आहेत. अनेक कामे सुरूच झालेली नाही. जिल्हा परिषद सदस्य मंजूर झालेल्या कामाबद्दल माहिती देत असताना बांधकाम अभियंते त्यास दुजोरा देत नाही. कृषी हंगाम सुरू झाला आहे. पुढे सर्वच महत्त्वाचे सण समोर आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी आता बिघडलेले रस्ते सुयोग्य करण्यास वेगवान हालचाल करणे अपेक्षित आहे.
राळेगाव, गुजरी, नागठाणा, परसोडा रस्त्याचे हाल अत्यंत वाईट आहे. गुजरी-परसोडा रस्ता मंजूर असूनही कामास सुरुवात झालेली नाही. राळेगाव-गुजरी रस्त्याचे खड्डे ग्रामस्थांनी श्रमदानाने मागच्या महिन्यात भरून रस्ता थोडाफार वाहतुकीयोग्य केला. रानवड ते पिंपळगाव रस्ता दोन महिन्यांपासून जैसे थेच आहे. राळेगाव-मोहदा मार्गावरील रावेरी-पिंपळखुटी-वरूड-मोहदा रस्त्याची स्थिती आणखी शोचनीय झाली आहे.
खैरी ते करणवाडी हा मार्ग गड्ड्यांचा मार्ग म्हणून ओळखला जावू लागला आहे. खैरी फाटा ते आष्टोना, मंगी, दहेगाव मार्ग ग्रामस्थांची परीक्षा घेणारा ठरत आहे. येवती-चहांद-खडकी रस्ता बांधून फार वर्षे झालेली नाहीत. तरी स्थिती वाईट झाली आहे. किन्ही फाटा ते चाचोरा रस्ता झाडगाव-झरगड रस्त्यांना आता नवनिर्माणाची प्रतीक्षा आहे. धानोरा ते रोहिणी रस्ता दुरुस्तीची मागणी करून ग्रामस्थ थकले आहे. उंदरी ते आदिवासी समाजाची पंढरी असलेल्या जागजई रस्त्याची स्थिती अत्यंत वाईट झाली आहे. अनेकदा अधिकारी व लोकप्रतिनिधींना निवेदने देण्यात आली, पण दुर्लक्ष केले जात आहे. या प्रश्नाकडे गांभिर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची मालिका
राष्ट्रीय महामार्ग असलेला वडकी-करंजी चारपदरी मार्ग दोन वर्षांच्या आतच खड्डेमय झाल्याने दररोज लहान-मोठे अपघात होवू लागले आहे. देखभाल दुरुस्तीच्या काळात खालावलेले रस्ते ठेकेदाराकडून पुन्हा दुरुस्त करून घेण्यास विभागांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.