शारीरिक शिक्षकांच्या बहिष्काराचा पुरता फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 01:42 AM2017-07-29T01:42:15+5:302017-07-29T01:42:50+5:30
अन्यायकारक असलेले २८ एप्रिलचे परिपत्रक मागे घ्यावे, या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्यावतीने शालेय स्पर्धेवर बहिष्कार आंदोलन सुरू केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अन्यायकारक असलेले २८ एप्रिलचे परिपत्रक मागे घ्यावे, या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्यावतीने शालेय स्पर्धेवर बहिष्कार आंदोलन सुरू केले आहे. यवतमाळ जिल्ह्यात मात्र या आंदोलनाचा पुरता फज्जा उडाला. शुक्रवारपासून नेहरू स्टेडियम येथे शासनाच्यावतीने सुरू झालेल्या जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत दहा शालेय संघांनी उत्साहाने सहभाग घेतला आहे.
शिक्षण आयुक्त पुणे यांनी २८ एप्रिल २०१७ रोजी परिपत्रक काढून शारीरिक शिक्षण विभागाच्या तासिका कमी केल्या. परिणामी या परिपत्रकामुळे शारीरिक शिक्षण शिक्षकांवर अतिरिक्त होण्याची वेळ आली आहे. या अन्यायकारक परिपत्रकाविरूद्ध राज्यातील सर्व शारीरिक शिक्षक व महासंघाने एकजुटीने आवाज उठविला. शासनाच्या शालेय क्रीडा स्पर्धेवर असहकार पुकारून बहिष्काराचे शस्त्र उगारले.
यवतमाळ जिल्ह्यातही शारीरिक शिक्षक संघटना, क्रीडा संघटना यांच्यावतीने प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकाºयांना २०१७-१८ च्या शालेय क्रीडा स्पर्धेवर बहिष्काराचे निवेदन देण्यात आले होते. दरवर्षी जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेची सुरुवात सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेने होत असते. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने बहिष्कार आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर स्पर्धा आयोजनाची जय्यत तयारी केली. जिल्ह्यातील सर्व शाळांना स्पर्धेत सहभागाचे आवाहन करून शालेय संघाची स्पर्धापूर्व नोंदणी न करता मैदानावरच नोंदणी करण्याची योजना आखली. याचा परिणाम २८ जुलैपासून सुरू झालेल्या जिल्हास्तर सुब्रतो मुखर्जी स्पर्धेत १४ वर्षाआतील मुलांच्या गटात दहा शालेय संघांनी सहभाग घेतला.
सकाळी १०.३० वाजता स्पर्धा संयोजक तथा क्रीडा अधिकारी संतोष विघ्ने, राहुल तपाळकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक सचिंद्र मिलमिले, किशोर चौधरी, शारीरिक शिक्षक प्रवीण कळसकर, संजय सातारकर, अविनाश भनक, गुणवंत सोनटक्के यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
या स्पर्धेत यवतमाळ पब्लिक स्कूल, संस्कार इंग्लिश स्कूल, पोदार इंटरनॅशनल स्कूल, के.डी. विद्यालय पुसद, स्वर्णलीला स्कूल, लायन्स स्कूल वणी, महर्षी विद्या मंदिर, अँग्लो हिंदी हायस्कूल, जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूल, सेंट अलॉयसिअस स्कूल या शालेय संघांनी सहभाग नोंदविला.
पोदार, जेडी संघ उपांत्य फेरीत
१४ वर्षाआतील मुलांच्या उपउपांत्य फेरीत जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूल विरूद्ध के.डी. स्कूल पुसद संघादरम्यान रोमहर्षक सामना झाला. निर्धारित वेळेत गोल न झाल्याने तब्बल ११ वेळा सामना ट्रायब्रेकरमध्ये गेला. शेवटी पेनॉल्टी शूट आऊटवर सामन्याचा निकाल लागला. यात जेडी संघाने तीन विरूद्ध दोन गोलने विजय साजरा करीत उपांत्य फेरीसाठी पोदार संघाने वायपीएस संघाचा १ विरूद्ध ० गोलने पराभव करून उपांत्य फेरीत धडक दिली. पहिल्या उपांत्य फेरीत महर्षी विद्या मंदिर संघाने स्वर्णलीला पुसद संघाचा पराभव करून अंतिम फेरीत थाटात प्रवेश केला.
खेळाडूंमध्ये प्रचंड उत्साह
शारीरिक शिक्षकांच्या बहिष्कारानंतरही या स्पर्धेत शाळांनी सहभाग नोंदविला. मैदानावर उतरलेल्या खेळाडूंमध्ये प्रचंड उत्साह होता. पाऊस असतानाही त्यांच्यातील जिद्द कायम होती. प्रत्येकजण आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत होता. क्रीडा प्रेमींकडूनही त्यांना चांगली दाद मिळत होती.