दु:ख शिवा; आयुष्य पळवा !
By admin | Published: January 23, 2016 02:31 AM2016-01-23T02:31:13+5:302016-01-23T02:31:13+5:30
शिवसैनिकांना स्वाभिमान शिकविणाऱ्या बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी महिलांना शुक्रवारी शिवणयंत्रांचे वाटप करण्यात आले.
स्वाभिमानाचा संदेश : शेतकरी विधवांना शिवणयंत्र दिले
यवतमाळ : शिवसैनिकांना स्वाभिमान शिकविणाऱ्या बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी महिलांना शुक्रवारी शिवणयंत्रांचे वाटप करण्यात आले. पैशांची मदत करण्यापेक्षा रोजगाराचे साधन देण्यात आले. तर शनिवारी शेतकरी महिलांसाठी आॅटोरिक्षा वाटपाची योजना सुरू होणार असल्याची माहितीही याच कार्यक्रमात देण्यात आली. मदतीसाठी सरकारकडे हात पसरण्यापेक्षा स्वयंरोजगार करीत शेतकरी महिलांनी स्वाभिमान जपावा, असा संदेश यावेळी देण्यात आला अन् हा स्वयंसिद्धतेचा मंत्र सांगण्यासाठी खुद्द बाळासाहेबांचे तरुण नातू आदित्य ठाकरे यांनी यवतमाळात पहिले वहिले जाहीर भाषण केले!
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यातील ६०० आत्महत्याग्रस्त शेतकरी महिलांना शिवणयंत्रांचे वाटप करण्यात आले. येथील पोस्टल मैदानावर झालेल्या या कार्यक्रमात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या भाषणाने युवासेनेच्या कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा दिली. भाषणाची सुरूवातीलाच आदित्य यांनी केलेल्या ‘जय महाराष्ट्र’ला शिवसैनिकांतून तडाखेबाज प्रतिसाद मिळाला. (स्थानिक प्रतिनिधी)