चहा विकता विकता केली शास्त्रीय संगीताची साधना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 10:01 PM2018-11-29T22:01:13+5:302018-11-29T22:08:22+5:30

सिनेसृष्टीतला अक्षय कुमार सुपरस्टार होण्यापूर्वी एका रेस्टॉरंटमध्ये वेटर होता.. ही कहाणी अनेकांना ठाऊक असेल. पण आपल्याच यवतमाळातही असा एक अक्षय आहे. चहा कॅन्टीनमध्ये राबून तो शास्त्रीय संगीताची साधना करतोय. त्याच्या चहाला चव असेल पण सुरांना चाहते आहेत.

Sadhana of classical music is sold for selling tea | चहा विकता विकता केली शास्त्रीय संगीताची साधना

चहा विकता विकता केली शास्त्रीय संगीताची साधना

Next
ठळक मुद्देअक्षय गुजर : यवतमाळात गवसला आठवा सूर

अविनाश साबापुरे ।
लोकमत न्यूज नेटवर्र्क
यवतमाळ : सिनेसृष्टीतला अक्षय कुमार सुपरस्टार होण्यापूर्वी एका रेस्टॉरंटमध्ये वेटर होता.. ही कहाणी अनेकांना ठाऊक असेल. पण आपल्याच यवतमाळातही असा एक अक्षय आहे. चहा कॅन्टीनमध्ये राबून तो शास्त्रीय संगीताची साधना करतोय. त्याच्या चहाला चव असेल पण सुरांना चाहते आहेत.
त्याचे पूर्ण नाव अक्षय रमेशराव गुजर. घरात हलाखी. शनिमंदिर चौकात वडील चहा कॅन्टीन चालवतात. कामाचा मार्ग व्हाया गरजेतून जातो. तर कलेचा मार्ग आवडीच्या झरोक्यातून सापडतो. लौकिक जगात जिवंत राहताना कलावंतांना या दोन्ही मार्गांवर पाय रोवण्याची सर्कस करावी लागते. तीच कसरत अक्षयच्या वडीलांनीही केली. चहा विक्रीसोबत त्यांना भजनांचाही छंद. घरी कालीमातेचे मंदिर आहे. तेथे दर मंगळवारी आरतीसाठी कधी त्यांना तबला, पेटी वाजवायला सहकारी मिळायचे, तर कधी मिळायचेच नाही. मग त्यांनी आपल्या पोरांनाच ‘तयार’ केले. अक्षय तिथेच हार्मोनियम शिकला. मोठा भाऊ तबला वाजवायचा.
शनिमंदिर चौकातल्या कॅन्टीमध्ये काम करायचे अन् वेळ मिळाला की गायन, वादनही करायचे, असा अक्षयचा दिनक्रम सुरू झाला. पण प्रतिभेचा धनी असलेल्या अक्षयची ‘चाहत’ चहापेक्षा स्वरांकडे अधिक. त्याने गणेश गुजर यांच्याकडे गायनाचे धडे गिरविणे सुरू केले. चहा विकता-विकता तो संगीत विशारदही झाला. आता तो मुक्त विद्यापीठातून संगीत विषयात पदवीचे शिक्षण घेतोय.
पण शिक्षणासोबतच त्याने आपल्या कलाकार मित्रांचाही परिघ वाढवत नेला. उमेश पवार, संतोष कोवे, प्रवीण गुजर, अजिंक्य शिंदे, योगेश ब्राह्मणे, आकाश सैतवाल यांच्यासह ‘जय महाकाली साई दरबार’ हा ग्रुप निर्माण केला. नवरात्री, लग्नसमारंभात हा ग्रुप आपल्या संगीताने धूम करतो. या ग्रुपला लागणारा ‘सपोर्ट’ कुमार झाडे देत असतात. श्री स्वामी समर्थ भजन मंडळात आपल्या कलेला पैलू पडल्याचे अक्षय सांगतो. तर मनोज तिडके यांचेही मार्गदर्शन मिळाल्याचे तो म्हणाला. त्याची कला पाहूनच लोकनायक बापूजी अणे विद्यालयात सध्या अक्षयला कंत्राटी तत्वावर संगीत शिक्षक म्हणून काम मिळाले. आपल्याला मिळालेली मदत इतरांनाही मिळावी, म्हणून तो आपल्या घरी ८-१० पोरांना मोफत शास्त्रीय संगीत शिकवित आहे. पण एवढे सगळे करतानाही अक्षयने बाबाच्या चहा कॅन्टीनवरचे काम काही सोडलेले नाही!
‘व्हर्सटाईल सिंगर’ बनणे हे अक्षयचे ध्येय आहे. स्वत:चा अल्बम काढावा ही त्याची इच्छा सध्या पैशाच्या अडचणीत अडकलीय. पण होईलच पूर्ण, कारण ‘जहा चाह हैं वहा राह हैं’!
बाबूजींच्या स्मृतिसमारोहात मान्यवरांनी केली पारख
स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतिसमारोहात दरवर्षी ख्यातनाम कलावंतांचे कार्यक्रम होतात. यंदा सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांची मैफल झाली. तर संगीतमय प्रार्थना सभेत स्थानिक गायकांनी स्वरांजली अर्पण केली. त्यातल्याच एका गायकाने ‘विठ्ठल आवडी प्रेमभावो’ अभंग तडाखेबाज आवाजात सादर केला. तो आवाज होता अक्षय गुजरच्या कष्टाचा. साऱ्यांनी त्याची प्रशंसा केलीच; पण ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावेंनी म्हटले, बाबूजींच्या स्मृतिसमारोहात यंदा संगीतक्षेत्राला आठवा सूर गवसलाय!

Web Title: Sadhana of classical music is sold for selling tea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.