पांढरकवड्याच्या कुख्यात सादिकला नागपुरातून अटक
By admin | Published: April 13, 2017 01:00 AM2017-04-13T01:00:03+5:302017-04-13T01:00:03+5:30
राष्ट्रीय महामार्ग क्र.७ वर चालकाचा खून करून ट्रकवर दरोडा घालण्याच्या प्रयत्नात असलेल्या
यवतमाळ : राष्ट्रीय महामार्ग क्र.७ वर चालकाचा खून करून ट्रकवर दरोडा घालण्याच्या प्रयत्नात असलेल्या पांढरकवडा येथील कुख्यात गुंड शेख सादिक शेख गफ्फार (३५) याला नागपूर रेल्वेस्थानकावर अटक करण्यात आली आहे. तो घटनेनंतर वर्षभरापासून पसार होता.
यवतमाळचे उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनात जमादार अजय डोळे, सैयद साजिद, वासू साठवणे, नीलेश राठोड यांच्या पथकाने ही कारवाई केली. त्यांना सायबर सेलचे फौजदार जिंदमवार, शिपाई कविश पालेकर, पंकज गिरी यांची मदत लाभली. सुमारे वर्षभरापूर्वी पांढरकवडा महामार्गावर वडकी ठाण्याच्या हद्दीत तामिलनाडूकडून येणारा एक ट्रक लुटण्याचा बेत कुख्यात शेख सादिक टोळीने आखला होता. त्यांनी ट्रक अडविला व चालकाचा खून केला. त्यानंतर हा ट्रक पळवून नेत असतानाच पांढरकवड्याचे एसडीपीओ साहेबराव जाधव यांचे पथक तेथे पोहोचले. या पथकातील शिपायाने सादिकला ओळखले. मात्र तो पसार झाला. त्याच्या साथीदारांना दुसऱ्या दिवशी अटक करण्यात आली होती. गेल्या वर्षभरापासून सादिक पोलिसांना गुंगारा देत होता. सादिक टोळीवर मोक्काही लावण्यात आला आहे. अखेर सादिक नागपुरात आश्रयाला असल्याची टीप मिळाली. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे सैयद साजिद यांच्या पथकाने त्याला अटक केली.