सालगड्याच्या मुलाचा एमबीबीएस प्रवेश अडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 09:46 PM2018-07-08T21:46:15+5:302018-07-08T21:48:02+5:30
व्यवस्था आता सुधारली आहे म्हणतात. शिक्षणाची दारे सर्वांनाच खुली झाली आहे म्हणतात... पण हे खरे नाही.. गरिबांच्या लेकरांसाठी अजूनही उच्च शिक्षणाची दारे मोफत उघडत नाही. एका साध्या सालगड्याने आपल्या पोराला डॉक्टर करण्याचे स्वप्न बाळगले.
अविनाश खंदारे।
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : व्यवस्था आता सुधारली आहे म्हणतात. शिक्षणाची दारे सर्वांनाच खुली झाली आहे म्हणतात... पण हे खरे नाही.. गरिबांच्या लेकरांसाठी अजूनही उच्च शिक्षणाची दारे मोफत उघडत नाही. एका साध्या सालगड्याने आपल्या पोराला डॉक्टर करण्याचे स्वप्न बाळगले. पोरगाही जीव लावून शिकला, देशपातळीवरील ‘नीट’ परीक्षा उत्तीर्ण करून एमबीबीएसच्या प्रवेशासाठी पात्र ठरला. पण आता मुंबईच्या महाविद्यालयाची फी भरण्याची सोयच नाही. अभ्यासासाठी त्याने जागून काढलेल्या रात्री... त्याच्या वडिलांनी गाळलेला घाम... यशस्वी होण्यासाठी एवढी किंमत पुरेशी नाही का?
तालुक्यातील दुर्गम बंदीभागातील जेवली नावाच्या गावातील मेहनती बाप-लेकाची ही संघर्ष काहीणी आहे. अरविंद गुलाब पडवाळे या विद्यार्थ्यांपुढे डॉक्टर होण्यासाठी पैसा आडकाठी होऊन उभा राहिला आहे. जेवली गावातील मथुरानगरमध्ये पडवाळे हे गरीब कुटुंब राहते. गुलाब पडवाळे हे लोकांच्या शेतात सालगडी म्हणून राबतात. त्यांची पत्नीही रोजमुजरी करते. आपला हुशार मुलगा अरविंद डॉक्टर व्हावा, ही त्यांची इच्छा. त्यासाठी त्यांनी काबडकष्ट करीत त्याला बारावीपर्यंत शिकविले.
अरविंद दहावीपर्यंत जेवलीच्याच राजारामबापू पाटील विद्यालयात शिकला. दहावीत ८८ टक्के गुण घेतल्यावर ढाणकीच्या संत गाडगे महाराज विजाभज उच्च माध्यमिक विद्यालयात गेला. २०१६ मध्ये तो ७१ टक्के गुणांसह बारावी झाला. डॉक्टर होण्याचे स्वप्न घेऊन तो पुढील शिक्षणासाठी नांदेडला गेला. सीईटी दिली. पहिल्या प्रयत्नात १४१ गुण मिळाले. हिंमत न हारता त्याने ‘नीट’ परीक्षा दिली. त्यात ३५७ गुणच मिळाल्याने एमबीबीएसला नंबर लागला नाही. पुन्हा परीक्षा दिल्यावर मात्र ३९३ गुणांसह तो एमबीबीएस प्रवेशाला पात्र झाला. मुंबईच्या लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेजसाठी त्याचा नंबर लागला आहे.
परंतु, सालगडी असलेल्या वडिलांकडे आता एमबीबीएसची फी भरण्याची सोयच नाही. अरविंदचा डीएड झालेला भाऊही पुण्यात खासगी कंपनीत काम करतो. दोन बहिणींचे लग्न झाले आहे.
फक्त तीन दिवसात जमणार का पैसा?
गुलाब पडावळे या गरीब माणसाने अत्यंत काबाडकष्ट उपसत अरविंदला शिकविले. डॉक्टरकीच्या दारापर्यंत पोहोचविले. पण आता एमबीबीएस प्रवेशाचे दार रग्गड पैशाविना उघडायला तयार नाही. फी भरण्याची १२ जुलै ही अंतिम मुदत आहे. दोन दिवसात जर पैशांची तजविज झाली नाही, तर आपल्या हुशार मुलाचे काय होणार या चिंतेने वडील गुलाब आणि आई पतियाबाई बेजार आहेत. कोणी येईल का त्यांच्या मदतीला धावून?