सहस्त्रकुंड धबधब्याचा ‘कुंड’ तळाला
By admin | Published: May 23, 2016 02:28 AM2016-05-23T02:28:45+5:302016-05-23T02:28:45+5:30
जिल्ह्याच्या पर्यटनाचा मानबिंदू असलेल्या सहस्त्रकुंड धबधब्याचा कधीही न आटणारा कुंड यंदाच्या भीषण दुष्काळात तळाला गेला आहे.
भीषण टंचाईचे संकेत : १९७२ च्या दुष्काळासारखी पुन्हा यंदा स्थिती
अविनाश खंदारे उमरखेड
जिल्ह्याच्या पर्यटनाचा मानबिंदू असलेल्या सहस्त्रकुंड धबधब्याचा कधीही न आटणारा कुंड यंदाच्या भीषण दुष्काळात तळाला गेला आहे. त्यामुळे या परिसरात भीषण पाणीटंचाईचे संकेत दिसत असून १९७२ च्या दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवर सहस्त्रकुंड धबधबा आहे. या धबधब्याचे पाणी ज्या कुंडात कोसळते तो कुंड खोल असून त्यातील पाणी कधीच आटत नाही. परंतु यावर्षी निर्माण झालेल्या भीषण दुष्काळाने या कुंडातील पाण्याची पातळी तळाला लागली आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेला हा धबधबा आता भकास झाला आहे. कुंडच आटत असल्याने परिसरातील भीषण पाणीटंचाईचे वास्तव लक्षात येते. १९७२ सालीही अशीच स्थिती निर्माण झाल्याचे जुने जाणते सांगत आहे. तशीच परिस्थिती आज निर्माण झाली आहे.
नदी कितीही कोरडी पडली तरी कुंड मात्र कधीच आटत नाही. या कुंडातील पाणी मोटारपंप लावून अनेक जण उपसतात. त्यातून परिसरातील अनेक गावांची तहान भागते. परंतु आता पाणीटंचाई अशीच कायम राहिल्यास या परिसरावर नवे जलसंकट ओढवण्याची भीती आहे.
कुंडाच्या तळाचा थांग नाही
पैनगंगा नदीवर असलेल्या सहस्त्रकुंड धबधब्याच्या कुंडाची खोली किती आहे हे कुणालाही सांगता येत नाही. याबाबत परिसरात अनेक आख्यायिकाही प्रसिद्ध आहे. या कुंडाची खोली मोजण्याचा प्रयत्न केला तेव्हा सात खाटांची दोरी एकत्र करून सोडली होती. परंतु तळाला दोर पुरला नव्हता, असे आजही परिसरातील वृद्ध जानकार सांगतात.