संत, महंत जिल्ह्यात करणार स्वच्छतेचा जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 11:40 PM2019-01-15T23:40:56+5:302019-01-15T23:42:12+5:30
राज्य हागणदरीमुक्त झाले असलेतरी शौचालयाचा नियमित वापर होत नाही. शौचालय नसणाºयांनी प्राधान्याने बांधावे, या मोहिमेला गती देण्यासाठी राज्यभर स्वच्छतेचा जागर हा कार्यक्रम राबविला जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राज्य हागणदरीमुक्त झाले असलेतरी शौचालयाचा नियमित वापर होत नाही. शौचालय नसणाºयांनी प्राधान्याने बांधावे, या मोहिमेला गती देण्यासाठी राज्यभर स्वच्छतेचा जागर हा कार्यक्रम राबविला जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाने मंगळवारी स्वच्छता विषयक परिषदेचे आयोजन केले होते. २६ जानेवारी ते १० फेबु्रवारी या कालावधीत अभियान राबविले जाणार आहे.
मोहिमेला गती देण्याबाबत पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचे अप्पर मुख्य सचिव श्यामलाल गोयल यांचे पत्र प्राप्त झाले आहे. याकरिता जिल्ह्यात २०० वारकऱ्यांची फळी निर्माण करण्यात आली. या वारकºयांना मंगळवारी प्रबोधनातील विषयाचे प्रशिक्षणही देण्यात आले. एका प्रवचनकाराकडे २४ गावांची जबाबदारी देण्यात आली आहे. या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संत महंताची मदत घेतली जाणार आहे. ही मंडळी गावामध्ये जाऊन प्रवचन करणार आहे. या प्रबोधनामध्ये शाश्वत स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता, स्वच्छता सुविधांची देखभाल दुरूस्ती, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, ओला कचरा आणि सुका कचरा कसा वर्गीकृत करायचा, प्लास्टीक बंदी आणि प्लास्टीकचे धोके त्याच बरोबर परिसर स्वच्छतेचे महत्व या विषयांवर संत महंत गावपातळीवर प्रबोधन करतील. एक प्रवचनकार एका दिवशी दोन गावांमध्ये प्रवचन करणार आहे. प्रवचनानंतर उपस्थित विद्यार्थी, ग्रामस्थांना शपथ दिली जाणार आहे. कार्यशाळेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी.बी. पाटील, स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधर, शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर, हभप श्यामसुंदर महाराज, भागवताचार्य गुलाबराव राऊत, हभप प्रभूदास शिरभाते, हभप पुरुषोत्तम इंगोले, हभप घोगरे महाराज, हभप लक्ष्मण तराळकर आदी उपस्थित होते.
आचारसंहितेपूर्वी मोेहिमेला गती
गत चार वर्षांपासून राबविण्यात येणारी स्वच्छतेची मोहीम अधिक गतीमान करण्यावर भर देण्यात आला आहे. निवडणूक आचारसंहितेपूर्वी स्वच्छतेचे संपूर्ण कामकाज अंतिम टप्प्यात पोहचावे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. संत महंतांमुळे या कामाला गती येईल, असा विश्वास जिल्हा परिषद यंत्रणेने व्यक्त केला.