संतसाहित्य जगाला प्रेरणा देणारे
By admin | Published: January 18, 2015 10:48 PM2015-01-18T22:48:58+5:302015-01-18T22:48:58+5:30
विठ्ठलराव पाटील देवसरकर साहित्य नगरी (उमरखेड) : संतांच्या अभंगातील प्रत्येक चरण हे सामर्थ्य संपन्न चरण असते. कोणत्याही बाबीकडे कसे पहावे अशी समर्थ दृष्टी देणारे संत साहित्य होय.
सु.ग. चव्हाण : ‘संत साहित्य व आधुनिक विचार’ यावर परिसंवाद
विठ्ठलराव पाटील देवसरकर साहित्य नगरी (उमरखेड) : संतांच्या अभंगातील प्रत्येक चरण हे सामर्थ्य संपन्न चरण असते. कोणत्याही बाबीकडे कसे पहावे अशी समर्थ दृष्टी देणारे संत साहित्य होय. त्यामुळेच आधुनिक युगात संत साहित्य जगाला निश्चितच प्रेरणा देत राहील, असे प्रतिपादन प्राचार्य सु.ग.चव्हाण यांनी केले.
विठ्ठलराव पाटील देवसरकर साहित्य नगरीत दहाव्या मराठा साहित्य संमेलनात रविवारी सकाळच्या सत्रात ‘संत साहित्य आणि आधुनिक विचार’ या विषयावरील परिसंवादात ते अध्यक्षस्थानाहून बोलत होते. तुकोबांनी ओव्या जरी लिहिल्या तरी शिव्या अनेक चरणांमधून बेधडक लिहिल्या आहेत. सत्य हाच देव आहे आणि देव हेच सत्य आहे. देव कसा तर शेतकऱ्यांचा देव काळा आहे अशा या श्री विठ्ठलाचे सुंदर रुप पाहून तुकोबा म्हणाले, ‘सुंदर ते ध्यान, उभे विटेवरील’ त्यांच्या या ओवीमध्ये प्रचंड प्रेरणा आहे. कुणी कोणता देव मानायचा हा ज्याचा त्याचा विषय आहे. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी हे गाडगेबाबा सांगतात. ज्या माणसात सज्जन पणा दिसला तोच खरा देव आणि तेच तीर्थक्षेत्र. तुकोबांनी सांगितले की, देव-धर्म विचारांच्या बाबतीत कुणालाही विचारायची गरज नाही म्हणून सत्य-असत्याशी मन केले ग्वाही मानियले नाही बहुमता. म्हणूनच हा विचार, ही भूमिका पुढे न्यायचा असेल तर संत साहित्याबद्दल आपल्याला विचार करावा लागेल, असे सु.ग. चव्हाण म्हणाले.
प्रा.अप्पासाहेब कल्याणकर म्हणाले, मनाची शांतता हवी असेल तर संत साहित्याची आवश्यकता आहे. जुन्या साहित्याला आधुनिक पद्धतीने प्रसारित केलं तर शेतकरी आत्महत्या करणार नाही. संत साहित्याचे अध्यासन केंद्र निर्माण केले तर विद्यापीठाच्या माध्यमातून प्रत्येकी २५ लाख रुपये उपलब्ध करून देण्याचे आवाहन त्यांनी केले. संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेचे गंगाधर महाराज कुरुंदकर म्हणाले, नामदेव महाराजांनी विठ्ठल भक्तीचा आणि भक्ताचं नातं सांगितले आहे. विठू माऊली तू माऊली जगाची असे ते म्हणतात. कीर्तन हे मनोरंजनाच साधन नव्हे तर प्रबोधनाचे माध्यम आहे. काम-क्रोध, मद-मत्सर यावर वार करणारे ते वारकरी संत साहित्याची वारशातील धागा म्हणजे वारकरी होय, असे सांगत कुरुंदरकर महाराज म्हणाले, संत साहित्य वाचताना आमचं डोकं धडावर ठेवावे लागले तरच सुंदर समाज घडविण्यास तयार होऊ.
गंगाधर बनबरे म्हणाले, संत हे माणसाच्या केंद्र स्थानी राहून विचार करतात. मूलभूत मानवाची प्रवृत्ती बदलणार नाही. जगात एक संघर्ष ईश्वरवाद्यांचा आहे. ईश्वरवाद्यांना आमचा ईश्वर सर्व श्रेष्ठ आहे आणि त्यामुळेच जग चालते, असे वाटते. तर दुसरीकडे भांडवलदार म्हणतात, आम्ही देवालाही विकत घेऊ शकतो. या दोहोच्या मध्ये संत कोठून आहे. तर मानवाच्या कल्याणाचा विचार घेऊन संत परंपरा आली.
सिंधू संस्कृतीमध्ये माणसाच्या भक्तीचा उगम सापडतो. माणूस कितीही आधुनिक झाला तरी त्याला संत साहित्याची गरज भासते. कुणाचाही मत्सर करू नये तर सर्व माणसांना घेऊन संतांचे तत्वज्ञान माणसांमध्ये रुजविणे हे संत साहित्य आहे, असे शेवटी त्यांनी सांगितले. परिसंवादाचे संचालन आनंद देशमुख यांनी तर आभार प्रवीण सूर्यवंशी यांंनी मानले.