पांढरकवडा तालुक्यात बोगस डॉक्टर झाले सैराट, तक्रारीशिवाय कारवाई नाही : बोगस डॉक्टरांचा शोध घेणारी समिती गेली कुठे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:50 AM2021-09-09T04:50:30+5:302021-09-09T04:50:30+5:30
पांढरकवडा शहरासह ग्रामीण भागात आजही राजरोस बोगस डॉक्टरांकडून रुग्णांवर उपचार केले जातात. त्यांचा शोध घेऊन कारवाई करण्यासाठी तालुका चौकशी ...
पांढरकवडा शहरासह ग्रामीण भागात आजही राजरोस बोगस डॉक्टरांकडून रुग्णांवर उपचार केले जातात. त्यांचा शोध घेऊन कारवाई करण्यासाठी तालुका चौकशी समितीने अधिक सक्रिय होऊन काम करणे गरजेचे आहे. डॉक्टरकीची कोणतीही पदवी न घेता केवळ एखाद्या रूग्णालयात डॉक्टरच्या हाताखाली काही वर्षे काम केलेले लोक फक्त अनुभवाचा आधार घेऊन रुग्णांवर उपचार करतात. त्यांच्या डिग्रीची शहानिशा न करता लोक हातगुण चांगला म्हणून त्याच्याकडे उपचारासाठी रांगेत उभे राहतात. यात एखाद्या रुग्णाचा जीव गेल्यावरच पोलखोल होते. अशा बोगस डॉक्टरांचा शोध घेण्यासाठी नगरपालिका, तालुका व जिल्हा प्रशासन पुढे येत नाही. पांढरकवडा शहरासह तालुक्यातील बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट आहे; परंतु तालुका किंवा जिल्हा समित्या या बोगस डॉक्टरांवर कारवाई करीत नाहीत. कोरोनाच्या काळातही बोगस डॉक्टरांचा व्यवसाय जोमाने चालला. तालुक्यात बोगस डॉक्टरांवर मागील अनेक वर्षापासून एकही कारवाई नाही. बोगस डॉक्टर शोधणाऱ्या या तालुका समितीत गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी असतात. नगरपालिका व महापालिका स्तरावर स्वतंत्र समिती असते. जिल्हाधिकारी स्तरावरील समितीत जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक असे अधिकारी असतात.